पारंपरिक चौकट मोडून वयाच्या सत्तावीसव्या वर्षी घेतील सर्जिकल उद्योगात भरारी; विदर्भातील पहिलीच युवती

केवल जीवनतारे
Friday, 23 October 2020

शिल्पाने दक्षिण नागपुरात २०१३ मध्ये शताब्दीनगर चौकात सर्जिकल साहित्याचे छोटेखानी दुकान थाटले. हळूहळू व्यवसायाचा आवाका वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता हाच व्यवसाय येथील मोठ्या जागेत भरभराटीला आला आहे.

नागपूर : अवघ्या सत्तावीस वर्षांच्या मुलीने पारंपरिक चौकटीला मोडून ‘सर्जिकल’ साहित्याच्या क्षेत्रात व्यवसाय उभा केला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या युवतीने सुरू केलेला हा व्यवसाय आता भरभराटीला आला आहे. कर्तृत्वाचा ठसा निर्माण करणाऱ्या त्या युवतीचे नाव शिल्पा पद्माकर गणवीर असे आहे.

शिल्पा ही सर्जिकल क्षेत्रात व्यवसाय करणारी विदर्भातील पहिलीच युवती आहे. सर्जिकल साहित्याच्या व्यवसायासोबतच नव्याने फिटनेस आणि क्रीडा साहित्य व्यवसायाकडेही झेप घेतली आहे. शिल्पाने अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी संपादन केली. नोकरी करावी आणि जीवन जगावे असा सूर घरात होता. परंतु, या सुरात सूर मिळवण्यासाठी ती तयार नव्हती.

सविस्तर वाचा - अर्थसंकल्पातून झलकेंचे तुकाराम मुंढे यांना फटके

शिल्पाने दक्षिण नागपुरात २०१३ मध्ये शताब्दीनगर चौकात सर्जिकल साहित्याचे छोटेखानी दुकान थाटले. हळूहळू व्यवसायाचा आवाका वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता हाच व्यवसाय येथील मोठ्या जागेत भरभराटीला आला आहे. मागील पाच वर्षांमध्ये विदर्भातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डिफेन्स, इतर सरकारी विभागांसह कार्पोरेट क्षेत्रात एक उद्योजक म्हणून शिल्पाने नाव मिळवले आहे.

युवतींना प्रेरणा मिळावी यासाठी शिल्पाने एक नवे उद्योगाचे दालन तयार केले आहे. वडील पद्माकर गणवीर शिल्पच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. आधुनिक काळात एका क्‍लिकवर जगात संवाद साधता येतो. जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणातून जग ओळखणं सोप झाले आहे. यामुळे मुलींनी उद्योगाच्या या नवीन दालनातही आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज व्हावे, असे शिल्पाचे म्हणणे आहे.

अधिक वाचा - नाथाभाऊंच्या राजीनाम्यानंतर समर्थकांचे फोन ‘नॉटरिचेबल’

समाज घडवण्यात महिलांचा मोठा वाटा
आपल्याला अभिप्रेत असलेल्या आर्थिक समानतेच्या विचारांकडे महिलांनी आधीपासून दुर्लक्ष केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि यातून महिला शिक्षण घेत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. मोठ्या पदांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. समाज घडवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे.
- शिल्पा गणवीर,
सर्जिकल साहित्य उद्योजक, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young woman from Nagpur is booming in the surgical industry