विद्यार्थी, खेळाडूंसाठी 'युथ होस्टेल', काय राहील सुविधा?

नरेंद्र चोरे  
सोमवार, 13 जानेवारी 2020

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या चार जिल्ह्यांमध्ये वसतिगृहे होणार आहेत. वसतिगृहासंदर्भातील प्रस्ताव फेब्रुवारी 2015 मध्येच शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु, त्यानंतर फारशी प्रगती होऊ शकली नाही.

नागपूर : विविध राष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना राहण्यासाठी हक्‍काचे स्थान मिळावे, या उद्देशाने देशभर युवा वसतिगृहे (युथ होस्टेल) बांधण्यात येत आहेत. नागपुरातही मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुल परिसरात लवकरच "युथ होस्टेल' साकारणार आहे. या वसतिगृहामुळे देश-विदेशातील विद्यार्थ्यांसह विविध क्रीडा स्पर्धांसाठी नागपुरात येणाऱ्या खेळाडूंच्याही निवासाची सोय होणार आहे. 

राज्यातील युवक-युवतींना भावी आयुष्याच्या जडणघडणीसाठी परीक्षा, प्रशिक्षण, मुलाखती, शिबिरे तसेच विविध चर्चासत्रांमध्ये नियमितपणे सहभागी व्हावे लागते. त्यासाठी "युथ होस्टेल'ची आवश्‍यकता असते. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या युवा धोरणांतर्गत विविध शहरांमध्ये विभागीय संकुलाच्या ठिकाणी वसतिगृहे बांधली जात आहे.

हेही वाचा - चला मॉलमध्ये तुम्हाला आजीबाई दाखवतो, वाचा ही विशेष बातमी...

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या चार जिल्ह्यांमध्ये वसतिगृहे होणार आहेत. वसतिगृहासंदर्भातील प्रस्ताव फेब्रुवारी 2015 मध्येच शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु, त्यानंतर फारशी प्रगती होऊ शकली नाही. मात्र तत्कालीन सत्तापक्षनेते व महापौर संदीप जोशी व क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांच्या पुढाकारामुळे वसतिगृह पूर्णत्वास जात आहे. 

क्रीडा प्रबोधिनीच्या बाजूला असलेल्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या या दुमजली एअर कंडिशन्ड वसतिगृहावर चार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. यात राहण्यासाठी 40 खोल्यांसह टॉयलेट-बाथरूम, एक्‍झिक्‍युटिव्ह सुट्‌स, व्हीआयपींसाठी खोल्या, कॅंटिन, पॅंट्री (डायनिंग हॉल), ई लायब्ररी, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, संगणक आदी सुविधा राहणार आहेत. यात केंद्र सरकारचा 75 टक्‍के, तर राज्य सरकारचा 25 टक्‍के वाटा राहणार आहे.

अधिक वाचा - दारू पिऊन जुने भांडण उकरून काढले आणि...

वसतिगृहासाठी पावणेचार कोटी आले असून, उर्वरित राशी लवकरच मिळणार असल्याचे क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांनी सांगितले. वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या वाटेवर असून, छपाई आणि टाइल्सचे काम बाकी आहे. 

माफक दरात निवासाची सोय

नागपुरात कोणताही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रम असला तरी, त्यासाठी आतापर्यंत आमदार निवासावर अवलंबून राहावे लागत. अनेकवेळा नागपुरात कार्यक्रमांची रेलचेल असल्यास आमदार निवासही उपलब्ध राहात नाही. अशावेळी "युथ होस्टेल' उत्तम पर्याय ठरणार आहे. या वसतिगृहाचा फायदा केवळ देशभरातील युवक-युवतींनाच नव्हे, युवा खेळाडूंनाही फायदा होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, भविष्यात अधिकाधिक राज्य व राष्ट्रीय स्पर्धाही होऊ शकतील. अत्यंत माफक दरात येथे निवासाची सोय होणार आहे.

मनस्वी आनंद 
उपराजानीत वर्षभर होणारे कार्यक्रम व विविध खेळांच्या स्पर्धा लक्षात घेता "युथ होस्टेल'ची अत्यंत आवश्‍यकता होती. उशिरा का होईना शहरात लवकरच आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे वसतिगृह बांधले जात आहे, याचा मनस्वी आनंद आहे. यामुळे देशभरातील युवक-युवतींसह युवा खेळाडूंचाही फायदा होणार आहे.' 
- सुभाष रेवतकर, 
क्रीडा उपसंचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth hostel in Nagpur for students, players