घरात सुरू होती लग्नाची तयारी आणि 'तो' बोहल्यावर चढण्यापूर्वीच... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

अविनाश हा मनमिळावू स्वभावाचा होता. महिनाभरावर लग्न असल्याने खुशीत होता. त्याचा कंपनी व्यवस्थापनाशी वाद होता. त्यामुळे तो ताणातही होता. त्याने तीन पानी नोट लिहिली अन्‌... 

नागपूर : एका युवकाचे काही दिवसांपूर्वीच लग्न जुळले अन्‌ साखरपुडाही झाला. नवीन संसार सुरू करण्याची तयारी सुरू होती. एकमेकांना भेटने, मॅसेच करणे, बोलणे यात तो रमला होता. घरच्यांनीही खरीदारी सुरू केली होती. महिनाभरानंतर त्याचे लग्न होणार होते. दुसरीकडे तो ज्या कंपनीत जात होता, तिथे त्याला मानसिक त्रास दिला जात होता. व्यवस्थापनाने मानसिक त्रास दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास सीताबर्डीत उघडकीस आली. अविनाश कांतीलाल सोनवाणे (वय 32, रा. संतोषीमातानगर, बिडीपेठ) असे मृत मजुराचे नाव आहे. 

सीताबर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश सोनवाणे हा रामदासपेठेतील शक्‍ती प्रेस-ऑफसेट कंपनीत कामाला होता. त्याला कंपनी व्यवस्थापनाकडून त्रास होता. ही बाब त्याने कुटुंबीयांनाही सांगितली होती. कंपनीकडून होत असलेल्या त्रासामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. तो रविवारी (ता. 5) पहाटेच्या सुमारास शक्‍ती प्रेसच्या तिसऱ्या माळ्यावरील शक्‍ती क्‍लबमध्ये गेला. क्‍लबमध्ये गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

हेही वाचा - प्रियकर म्हणाला चल पळून जाऊ...बसवले दुचाकीवर अन्‌ नेले ईथे 

सकाळी साडेआठच्या सुमारास टेबलटेनिस खेळण्यासाठी काही खेळाडू आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत एक युवक दिसल्याने त्यांनी आरडाओरड केली. दीपक धोटे यांनी सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेरकी पथकासह घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

पुढच्या महिन्यात होते लग्न

अविनाश हा मनमिळावू स्वभावाचा होता. काही आठवड्यांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. त्याचे फेब्रुवारीत लग्नही ठरले होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. महिनाभरावर लग्न असल्याने अविनाश खुशीत होता. मात्र, तो बोहल्यावर चढण्यापूर्वीच फासावर चढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

क्लिक करा - चालकाला लागली डुलकी अन्‌ घडले आक्रित...

तीन पानी सुसाइड नोट

अविनाश सोनवाणे याचा कंपनी व्यवस्थापनाशी वाद होता. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानी सुसाइड नोट लिहिली. "शक्‍तीमध्ये कुणीही काम करू नका. येथे खूप टॉर्चर केले जाते', असा उल्लेख सुसाइड नोटमध्ये असल्याचे एपीआय शेरकी यांनी सांगितले. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाचीही बाजू ऐकून घेण्यात येणार असून, अन्य कर्मचाऱ्यांच्या बयाणातून माहिती मिळविण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth suicide just a month before marriage in Nagpur