झॉलिवुड : फ्रान्समध्ये गाजला नागपूरकर तरुणाचा आविष्कार 

zollywood
zollywood

नागपूर : नागपूरकर युवा दिग्दर्शक तृषांत इंगळे यांचा झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित "झॉलिवुड' हा पहिलाच चित्रपट फ्रांसमध्ये झालेल्या इंडियन फेस्टिवल ऑफ तौलौस गाजला आहे. विशेष म्हणजे चित्रपटाला बेस्ट ज्युरी पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत असताना झॉलिवुडची ही बातमी आनंदाची ठरणार आहे. 

एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणारा "झॉलिवुड' कोरोनाच्या प्रकोपामुळे प्रदर्शित झालेला नाही. चित्रपटाची कथा आसावरी नायडू यांची असून पटकथा तृषांत इंगळे यांची आहे. विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे व शाश्वत सिंग यांची निर्मिती व ड्यूक्‍स फार्मिंग फिल्म्स आणि अमीत मासूरकर यांनी प्रस्तुती केली आहे. न्यूटन, सुलेमानी किडा असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मासूरकर हे या चित्रपटाचे क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आहेत. 

तृषांत इंगळे या नवीन दमाच्या दिग्दर्शकाने वेगळ्या धाटणीचा विषय निवडून त्यावर मला कथा लिहायला सांगितली. या चित्रपटात मी भूमिकादेखील केलेली असल्यामुळे मला या टीआयएफएफ फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळाल्याचा अधिकच आनंद झाला आहे. तृषांतने तीन वर्ष अफाट मेहनत करून हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाला हा सन्मान मिळणे केवळ आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे मत झाडीपट्टी अभिनेत्री व लेखिका आसावरी नायडू यांनी व्यक्त केले. तृषांतने अगदी लहानपणापासून झाडीपट्टी रंगभूमीवर काम केले आहे.

झॉलिवुड चित्रपटाला फ्रांसच्या चित्रपटात स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहे. विशेष म्हणजे माझ्या ह्रदयाच्या जवळ असलेल्या झाडीपट्टीला चित्रपटाच्या निमित्ताने न्याय देता आला, याचे समाधान अधिक आहे. 
तृषांत इंगळे, दिग्दर्शक  

विदर्भात लोकप्रिय असलेली झाडीपट्टी रंगभूमीवर पहिल्यांदा चित्रपट करण्याचे धाडस तृषांतने केले आहे. वयाच्या 16 व्या वर्षी या क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने मुंबईत गेलेल्या तृषांतने याआधी बुधिया सिंग या चित्रपटात भूमिका केली असून न्यूटन चित्रपटासाठी कास्टींग असोसिएट म्हणून काम केले आहे. न्यूटन हा चित्रपट 2017 साली ऑस्करसाठी भारताकडून अधिकृतरित्या प्रवेशिका म्हणून पाठवला गेला होता. याशिवाय, इंडियन फेस्टिवल ऑफ तौलौसमध्ये या चित्रपटाला स्पेशल ज्युरी पुरस्कारही प्राप्त झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com