मी पांगोली नदी बोलतेय... वाचा माझी कथा आणि व्यथा

मुनेश्‍वर कुकडे
गुरुवार, 4 जून 2020

राइस मिल्स, लाख कारखाने, टाइल्स कारखाने व प्रशासनाने मंजुरी दिलेल्या कारखान्यांतून सतत वाहणारे दूषित पाणी, राइस मिलमधून निघणारी राख यामुळे माझे पाणी दूषित झाले आहे. जलप्रदूषण वाढले आहे. अशा पाण्याच्या वापरामुळे शेती, नागरिक व जनावरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. माझे पाणी पिण्यायोग्य तर राहिलेच नाही,

गोंदिया : होय मी तीच... एकेकाळी शेतकरी अन गोंदिया, गोरेगाव, आमगाव तालुक्‍यांतील शेकडो नागरिकांची तहान भागविणारी पांगोली नदी. परंतु, आज मला माझे अस्तित्वच कळेना. मी उथळ झालेय. पाण्याची साठवणूक करता येईना. प्रदूषित झालेय. माझे रूप पुन्हा समोर यावे, यासाठी काहींनी प्रयत्न केलेत. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींपासून थेट मंत्रालय गाठले; मात्र अजून कोणाचेही लक्ष गेले नाही. मी यंदाही तुमच्या पिकाला, तुमच्या जनावरांना, शिवाय तुम्हालाही हवे असलेले पाणी देऊ शकत नाही. 

गोरेगाव तालुक्‍यातल्या तेढा या गावी असलेल्या सरोवरातून माझा (पांगोली नदी) उगम झाला. गोंदिया तालुक्‍याला लागून असलेल्या खातिया गावाजवळ छिपीया येथे मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट सीमारेषेवरील वाघ नदीत माझा विलय होत असतो. गोंदिया व गोरेगाव या दोन्ही तालुक्‍यांतील जवळपास 60 किलोमीटर क्षेत्र तसेच आमगाव तालुक्‍यातील जवळपास 15 किलोमीटर क्षेत्र मी व्यापले आहे. गोंदिया, गोरेगाव तालुक्‍यांतील शेकडो शेतकरी माझ्या पाण्यावर शेती पिकवत असतात.

आमगाव तालुक्‍यातील काही गावांनाही माझ्या पाण्याचा लाभ होतो. यातून शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असतो. मात्र, आजघडीला माझी अवस्था अतिशय बिकट झाली आहे. अस्तित्वाच्या खुणा मी शोधत आहे. 
माझे पात्र उथळ होत चालले आहे. त्यामुळे पावसाळ्यात साचलेले पाणी वर्षभर साचून राहत नाही. माझ्या पात्रातून अवैधरित्या वाळूउपसा केला जातो. काठांवरील झाडांची अनिर्बंध कटाई होत असल्याने काठ नष्ट होत आहेत. त्यामुळे पात्र आकाराने मोठे होत असून, उथळ होऊ लागले आहे. काठावर माती साचल्याने खोली मात्र कमी होत आहे. 

विशेष म्हणजे, माझ्या उगमापासून विलयापर्यंत एकाही ठिकाणी बांध अथवा बंधारे शासकीय यंत्रणेकडून बांधण्यात आले नाहीत. माझ्या पात्रात दरवर्षी अंत्यसंस्कार, मूर्ती विसर्जन केले जाते. परिणामी मी प्रदूषित झाले आहे. गाळ साचण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, प्रशासनाचे गाळउपशाकडे दुर्लक्ष झाले आहे. आणि हो, माझ्या काठाशेजारील, मला मिळणाऱ्या नाल्याशेजारील राइस मिल्स, लाख कारखाने, टाइल्स कारखाने व प्रशासनाने मंजुरी दिलेल्या कारखान्यांतून सतत वाहणारे दूषित पाणी, राइस मिलमधून निघणारी राख यामुळे माझे पाणी दूषित झाले आहे. जलप्रदूषण वाढले आहे. अशा पाण्याच्या वापरामुळे शेती, नागरिक व जनावरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. माझे पाणी पिण्यायोग्य तर राहिलेच नाही, शेती आणि जनावरे, जंगली प्राण्यांसाठीदेखील अनुपयुक्त आहे. 

हेही वाचा : वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू 

दरम्यान, माझे पुनरुज्जीवन व्हावे, माझा विकास व्हावा, याकरिता गोंदियातल्याच समाजोन्नती बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी विकास संस्थेने गेली कित्येक वर्षे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींपासून थेट मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला. निवेदने दिली; पण निगरगट्ट सरकारला अजूनही जाग आली नाही. याच वर्षी पुन्हा जानेवारीत या संस्थेने स्थानिक खासदारांमार्फत थेट पंतप्रधान मोदी यांना निवेदन पाठवले. वाटलं होतं, माझा आतातरी विकास होईल, पुनरुज्जीवन होईल; पण कोणीही काहीच हालचाली सुरू केल्या नाहीत. आता पावसाळा येतोय, माझ्या पाण्याची गरज तिन्ही तालुक्‍यांतील नागरिक, शेतकऱ्यांना, त्यांच्या जनावरांना भासेल, हे मलाही माहीत आहे; पण मी प्रदूषित झाले आहे. यंदाही माझे विषयुक्त म्हणाल तरी चालेल असे प्रदूषित पाणी तुमच्या उपयोगी ठरणार नाही. 
 

पांगोली नदी ही जिल्ह्याची जीवनदायिनी आहे. मात्र, ही नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे पाण्याचा उपयोग कोणालाही करता येत नाही. आम्ही या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी, किंबहुना विकासासाठी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना निवेदने दिली. पत्रव्यवहार केला. जिल्हाधिकाऱ्यांना समस्या समजावून सांगितली; परंतु कोणाचेही या नदीकडे लक्ष जाऊ नये, हे दुर्भाग्य आहे. या नदीच्या विकासासाठी आमचा लढा अविरत सुरू राहील. 
-तीर्थराज उके, सचिव 
समाजोन्नती बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी विकास संस्था, गोंदिया. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  I am pangoli river speaking