गडचिरोली - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी स्थापन केलेल्या ‘सर्च’ या संस्थेने महात्मा गांधी यांचे विचार आरोग्यक्षेत्रात अंमलात आणण्याचा प्रयत्न प्रभावीरीत्या गेल्या ४० वर्षांत केला आहे..महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाचे प्रतिबिंब म्हणजे ‘सर्च’ आयोजित करत असलेली शस्त्रक्रिया शिबिरे आहेत. विशेष म्हणजे मागील तीन दशकांत ‘सर्च’मध्ये दहा हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत..या उपक्रमात राज्यातील आणि देशातील विविध भागांतील डॉक्टर गडचिरोलीत येतात आणि आपली सेवा देतात. या उपक्रमातून आतापर्यंत दहा हजार शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. गडचिरोलीतील गरजू आदिवासी आणि ग्रामीण रुग्णांना मोफत होत असलेल्या शस्त्रक्रिया या फार मोठा आधार ठरलेल्या आहेत..गडचिरोली जिल्हा हा देशातील दुर्गम जिल्ह्यांपैकी एक मानला जातो. या जिल्ह्यात आरोग्यसुविधांचा प्रसार आजही पुरेशा प्रमाणात झालेला नाही. पण ‘सर्च’ने कल्पक उपाय योजत आरोग्य सुविधांमध्ये अंत्योदय साधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सर्च’चे माँ दंत्तेश्वरी रुग्णालय १९९३ पासून कार्यरत आहे..आदिवासी आणि ग्रामीण रुग्णांच्या गरजांचा अंतर्भाव या रुग्णालयाच्या रचनेत आणि कार्यप्रणालीत करण्यात आला. १९९६ मध्ये या रुग्णालयामध्ये डॉ. शरद सालफळे यांचे हायड्रोसीलसाठी पहिल्यांदा शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले, अशी माहिती ‘सर्च’चे सहसंचालक तुषार खोरगडे यांनी दिली. दुर्गम गडचिरोलीत तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता होणे, ही काही सोपी गोष्ट नव्हती..यावर उपाय म्हणून ‘सर्च’मध्ये नियमित शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली जाऊ लागली. वर्ष २०२४-२५ या एका वर्षांत ‘सर्च’मध्ये ३० शस्त्रक्रिया शिबिरांतून १,१५२ इतक्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. ‘सर्च’मध्ये १९९६ पासून आत्तापर्यंत दहा हजार शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. २०१९मध्ये ‘सर्च’च्या रुग्णालयाचा विस्तार करण्यात आला..तीस कोटी रुपयांची बचतगेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या सेवेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचे जवळपास ३० कोटी रुपये वाचले आहेत. आदिवासी, ग्रामीण गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया तर होतातच, पण जोडीने रुग्ण आणि रुग्णांसोबत राहत असलेल्या नातेवाईकांनाही मोफत जेवणाची सुविधाही दिली जाते. याशिवाय रुग्णांना एक्सरे, प्रयोगशाळा तपासण्या, औषधे यांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता भलावी यांनी दिली..‘सर्च’मध्ये २००२ पासून शस्त्रक्रिया शिबिर घेतो. ‘सर्च’मध्ये काळानुरूप बदल होत गेले आहेत. गडचिरोलीत रुग्णांसाठी ‘सर्च’ने वेळोवेळी आधुनिक उपकरणे उपलब्ध केली आहेत. सर्च हे एक प्रकारे आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे.- डॉ. संजय शिवदे, लोणंद.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.