
१०८ रुग्णवाहिका ठरत आहे प्रसूतिगृह; आठशेवर सुखरूप प्रसूती
अचलपूर : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकेमुळे अमरावती जिल्ह्यात गेल्या आठ वर्षांत जवळपास अडीच लाखांवर रुग्णांना जीवदान मिळाले आहे. सोबतच हीच रुग्णवाहिका आता महिलांच्या बाळंतपणासाठीही उपयोगी ठरत आहे. १०८ क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत आतापर्यंत ८९४ बाळंतपण सुखरूपपणे झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिका चाकावरचे प्रसूतिगृह ठरत आहे, असे म्हटले तर वावगे वाटू नये.
२६ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या शासकीय १०८ रुग्णवाहिका सेवेमुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना मोफत रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध झाली आहे. अपघातातील जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायी ठरत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेला शहरासह जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपत्कालीन प्रसंगात मदतीला तत्काळ धावून गेल्यामुळे रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळवून देण्याची किमया आपत्कालीन आरोग्यसेवेने साधली आहे.
गेल्या आठ वर्षांत रस्ते अपघात, विषबाधा, शॉक लागणे, गर्भवतींच्या प्रसूती यासारख्या विविध आजारांच्या रुग्णांना संकटाच्या काळात रुग्णवाहिकेने मदतीचा हात दिला आहे. २६ जानेवारी ते आजपर्यंत या आठ वर्षांत जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार १८५ विविध प्रकारच्या रुग्णांना वेळेत रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पोहोचवत त्यांना मोलाची साथ दिली आहे.
रुग्णवाहिका नव्हे मिनी आयसीयू
शहरासह जिल्ह्यात ३१ रुग्णवाहिका कार्यान्वित आहेत. यापैकी ६ मिनी आयसीयू (अॅडव्हॉन्स लाइफ सपोर्ट) असून उर्वरित २५ रुग्णवाहिकांचा समावेश बेसिक लाइफ सपोर्टमध्ये (बीएलएस) होतो. रुग्णवाहिकांसोबत चालक आणि एक डॉक्टर कायमस्वरूपी असतो. अतिदक्षता विभागामध्ये असलेली यंत्रणा व उपचार साधनसामग्री या रुग्णवाहिकांमध्ये उपलब्ध असल्याने या रुग्णवाहिका एकप्रकारच्या मिनी आयसीयूच आहेत.
रुग्णवाहिकेसाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास काही मिनिटातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होते. रुग्णवाहिकेत डॉक्टर असल्याने ते तत्काळ उपचार सुरू करतात, त्यानंतर जवळील खासगी किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करतात. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला निर्माण झालेला धोका कमी होतो. नागरिकांनी शासकीय १०८ रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा.
- डॉ. नरेंद्र अब्रुक, जिल्हा समन्वयक, १०८ रुग्णवाहिका
Web Title: 108 Ambulances Coming Maternity Hospital Delivery Government Free Ambulance Service Patients Rural And Urban Areas
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..