सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू

राजेश रामपुरकर
शनिवार, 13 जुलै 2019

नागपूर : वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 5, अमरावती तीन, नागपुरात दोन वाघ दगावले. तर यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला. त्यातील सहा वाघांची शिकार झाल्याचे उघडकीस आल्याने वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

"देशातील वाघांची राजधानी' असे बिरुद मिरविणाऱ्या महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे होणारे मृत्यू चिंता वाढविणारे आहेत. सहा दिवसांपूर्वी चिमूरजवळील मोटोपार शिवारात कुत्र्यासाठी टाकलेले विष खाल्याने तीन वाघ दगावले. त्यामुळे राज्य सरकारला पुन्हा आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहे. वाढलेल्या शिकारीचा विषय वन विभागाने गंभीरपणे घेतला आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वाघाचे अस्तित्व असलेल्या परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आलेली आहे. काही गावात शोधमोहीम राबविण्यात आली. देशभरात आतापर्यंत 54 वाघ दगावले. त्यात मध्य प्रदेशात सर्वाधिक 15 तर महाराष्ट्र 12 वाघ गमावून दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक राज्याने नऊ वाघ गमावले. गेल्या महिन्यातच शिक्षा उपभोगून तुरुंगातून सुटलेले वाघांचे शिकारी पुन्हा सक्रिय होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाघ वाढलेले असताना त्यांच्या संरक्षणासाठी डोळ्यात तेल टाकून गस्त करावी लागणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 tigers die in six months