
मूल (जि. चंद्रपूर) : जिल्ह्यातील बेंबाळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे (rural hospital) काम मागील बऱ्याच दिवसांपासून कासवगतीने सुरू आहे. त्यातच येथील रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे बेंबाळ आणि परिसरातील तेरा ते चौदा गावांतील रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. कोरोनाच्या काळात या इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन इमारतीचे काम रेंगाळतच चालले आहे. (13 villages still waiting for hospital in mul of chandrapur)
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेले बेंबाळ हे ग्रामपंचायतस्तरावरील मोठे गाव. गावातील लोकसंख्येचा विचार करता येथे मागील बऱ्याच वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे. लोकसंख्येची व्याप्ती वाढली. नांदगाव, घोसरी, चांदापूर, नवेगाव भू. तसेच आजूबाजूच्या तेरा खेडेगावातील रुग्ण येथे उपचारासाठी येत असल्याने याठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीला मान्यता मिळाली. शासन आणि प्रशासनाच्या मान्यतेनुसार, येथे नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. परंतु, कोरोना काळातील पहिले वर्ष निघून गेले, तरी इमारतीचे काम रेंगाळत असल्याचा आरोप होत आहे.
कोरोना बांधितांची संख्या ग्रामीण भागामध्येसुद्धा वाढत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरातील रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले असताना अशा परिस्थितीत बेंबाळ येथील नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक होते. ग्रामीण रुग्णांसाठी ही इमारत आधार ठरली असती. परंतु, बेंबाळवासींना या इमारतीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. संबंधित कत्रांटदार, बांधकाम विभाग आणि शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. संसर्गाच्या काळात ग्रामीण रुग्णांना योग्य आरोग्य सेवेअभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असून, इतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पाच नंतर दवाखान्यात कुणीच उपस्थित राहत नसल्याने रात्रीच्या सुमारास रुग्णांना भरती करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना जीव धोक्यात घालूनच तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. बेंबाळ येथील ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत 13 ते 14 गावे समाविष्ट असून, या गावांतील जनतेला योग्य उपचाराअभावी त्रास सहन करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.