Women MP : विदर्भातून ७२ वर्षांत झाल्या केवळ १४ महिला खासदार; भावना गवळी पाचवेळा विजयी

महिलांना उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी आखडता हात घेतला. गेल्या ७२ वर्षांमध्ये विदर्भातून आतापर्यंत केवळ १४ वेळा महिला खासदार निवडून आल्या आहेत.
womens mp in vidarbha
womens mp in vidarbhasakal

नागपूर - महिलांना उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी आखडता हात घेतला. गेल्या ७२ वर्षांमध्ये विदर्भातून आतापर्यंत केवळ १४ वेळा महिला खासदार निवडून आल्या आहेत. यामध्ये भावना गवळी यांनी शिवसेनेकडून तब्बल पाचवेळा लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. २०१९ मध्ये भावना गवळी आणि नवनीत राणा ह्या दोन महिला खासदार होत्या. या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर एकमेव महिला खासदार निवडून आल्या आहेत.

१९५० मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतर १९५२ मध्ये देशात लोकसभेची पहिली निवडणूक झाली. ४९८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्यांमध्ये महिला उमेदवारांची संख्या नगण्य होती. पहिल्या निवडणुकीत विदर्भात नागपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या अनुसयाबाई पुरुषोत्तम काळे ह्या पहिल्या महिला खासदार ठरल्या.

पहिल्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष नागपूर लोकसभा मतदारसंघाने वेधले होते. कारण, या मतदारसंघात काँग्रेसच्या अनुसयाबाई काळे आणि एसपीचे विनायक सखाराम दांडेकर यांच्यात मुकाबला होता. अनुसयाबाई यांनी दांडेकरांचा दणदणीत पराभव केला. हिंदू महासभेचे नारायण भास्कर खरेही मैदानात होते.

स्वातंत्र्य वीरांगणा असलेल्या अनुसयाबाई काळे यांनी महात्मा गांधी यांच्या समवेत १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहात आणि १९४२ च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांनी तुरूंगवासही भोगला. १९५७ मध्ये त्या पुन्हा नागपूरमधूनच विजयी झाल्या. खासदार असतानाच त्यांचा १९५८ मध्ये मृत्यू झाला.

वाशिम-यवतमाळ मतदारसंघातील जनतेने भावना गवळी यांना तब्बल पाचवेळा विजयी केले. २००४ आणि २००९ मध्ये केंद्र आणि राज्यात लोकशाही आघाडीचे सरकार असतानाही भावना गवळी विजयी झाल्या होत्या.

पहिला मान नागपूरला

१९६० पर्यंत विदर्भाचे राजकीयदृष्ट्या अस्तित्व नव्हते असे म्हणावे लागेल. कारण, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होईपर्यंत वर्तमान विदर्भाचा भाग मध्य प्रदेशात मोडल्या जात होता. १९५७ मध्ये नागपूरमधून अनुसयाबाई काळे दुसऱ्यांदा खासदार झाल्या होत्या. त्यानंतर तब्बल २३ वर्षांनी १९८० मध्ये अमरावतीमधून उषा चौधरी विजयी झाल्या होत्या. ७२ वर्षांच्या काळात एकूण १४ वेळा विदर्भातून महिला खासदार विजयी झाल्या. त्यात अनुसयाबाई काळे आणि उषा चौधरी प्रत्येकी दोनवेळा तर भावना गवळी पाचवेळा विजयी झाल्या.

२०२४ मध्ये प्रतिनिधित्व घटले

लोकसभेच्या या निवडणुकीत विदर्भात महिला खासदारांचे प्रतिनिधित्व एकने घटले आहे. २०१९ मध्ये भावना गवळी आणि नवनीत राणा निवडून आल्या होत्या. पण, शिवसेनेने गवळी यांचे तिकीट कापले तर अमरावतीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. यवतमाळ-वाशिममधून गवळी यांच्या जागी तिकीट दिलेल्या राजश्री पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com