विठ्ठल मंदिराच्या काकड आरतीला 150 वर्षांची परंपरा

आरमोरी : काकड आरतीत मग्न गावातील नागरिक.
आरमोरी : काकड आरतीत मग्न गावातील नागरिक.

आरमोरी (जि. गडचिरोली) ः येथील विठ्ठल मंदिरात दरवर्षी कार्तिक महिन्यात मोठ्या उत्साहात पहाटे काकड आरती केली जाते. काकड आरती म्हणजे एक महिना चालणारा हा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातो, अशी समजूत आहे. वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर सूर निनादत असतो.
एकेकाळी सर्व गावकरी परिसरातील लोक एकत्रित सामूहिकपणे काकडा आरती करीत. त्याचे प्रमाणही मोठे होते. परंतु अलीकडच्या काळात काकड आरतीची गर्दी ओसरू लागली आणि काकड आरतीमध्ये येणाऱ्या तरुणांची संख्याही कमी झाली. आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरुष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकड आरती करतात. विठ्ठल मंदिरातील काकड आरतीमध्ये टाळ, मृदुंग यांच्या तालावर भजने सादर होतात. आताही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात. पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी, आरोग्य सुदृढ राहावे असाही काकड आरतीमागील उद्देश असू शकतो. त्यामागे आरोग्यविषयक भावना निश्‍चितच दडलेली आहे. परंतु बहुतांश भाविक काकड आरतीकडे धार्मिक दृष्टिकोनातूनच पाहतात. मंदिरातील काकड आरती आटोपल्यानंतर भाविक "जय जय राम कृष्ण हरी'चा गजर करीत टाळ-मृदुंगाच्या तालावर प्रदक्षिणा घालतात. चातुर्मासात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निद्रेमध्ये असतात. त्यांना उठविण्यासाठी ही काकड आरतीची परंपरा असल्याचे बोलले जाते. आरती दरम्यान 3 मंगलचरण, काकडा आरतीचे अभंग, भूपाळीचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव आंधळा, पांगुळ, गवळणी आदीसह गणपतीची, भैरवनाथाची, विठ्ठलाची आरती होते. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप होते. पांडुरंगाष्टक, कालभैरवाष्टक झाल्यानंतर काकड आरतीची समाप्ती होते. अशा काकड आरतीची 12 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेला सांगता होणार आहे.
धार्मिक महत्त्व
हिंदूधर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती म्हणजे ही काकड आरती होय. यावेळी देवाच्या मूर्तीला एक प्रकारची कापसाची तुपात भिजवलेली ज्योत ओवाळली जाते. म्हणून याला काकडा किंवा काकड आरती, असे म्हणतात. भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात विशेषत: कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते. कार्तिक महिन्याच्या शुक्‍ल एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी विठ्ठल मंदिरात काकड आरती करण्याची परंपरा मागील 150 वर्षांपासून सुरू आहे. आरतीनंतर विविध भजने अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. संत तुकाराम महाराज, संत रामदास, संत एकनाथ आदी संतांनी रचलेल्या काकड आरतीचे गायन केले जाते. कोजागरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com