नक्षल्यांच्या धास्तीने आठवडी बाजार निराधार!

File photo
File photo

गडचिरोली : आठवडी बाजारातील गर्दीचा लाभ घेत नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले केले. यात पोलिस खबऱ्यासह काही जवान शहीद झालेत. या घटनांच्या धास्तीने नियोजित जागा सोडून पोलिस ठाणे किवा मुख्य मार्गावरच बाजार भरवला जात असल्याचे चित्र काही दुर्गम गावामध्ये दिसून येत आहे.
अहेरी तालुक्‍यातील पेरमिली येथील आठवडी बाजारात 2010 मध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एका जवानाला आपला जीव गमवावा लागला होता. तर 2012 मध्ये बाजारातील रस्त्यावर घडवून आणलेल्या शक्तिशाली भूसुरुंग स्फोत 4 पोलिस अधिकारी शहीद झाले होते. या घटनेनंतर तेथील आठवडी बाजार भामरागड-आलापल्ली या मुख्य रस्त्यावर भरविला जात आहे.
जागतिक बॅंक अर्थसाहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत पेरमिली येथे 2017-18 मध्ये आठवडी बाजारात ग्रामपंचायत प्रशासनामार्फत 24 लाख रुपये खर्च करून बाजाराचे ओटे बांधले. व्यापाऱ्यांसाठी अन्य सोयीसुविधा तसेच सौंदर्यीकरणही केले. आता मात्र नक्षलवाद्यांच्या धास्तीने येथे बाजार भरवण्यास पोलिसांनी सुरक्षेचे कारण पुढे करून बाजार भरविण्यास मनाई केली आहे, त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधकाम केलेला आठवडी बाजार गेल्या वर्षभरापासून धूळखात पडला आहे.
20 ऑक्‍टोंबर 2016 ला एटापल्ली तालुक्‍यात हेडरी येथील बाजारात नरोटे नामक पोलिस खबऱ्याची नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आली. 31 जानेवारी 2017 मध्ये बुर्गी येथे पोलिस खबऱ्याच्या संशयावर इरपा उसेंडी तर 4 मार्च 2018 ला गट्टा येथील आठवडी बाजारात नक्षलवाद्यांनी पोलिस शिपाई रोमाची मट्टामी यांच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले. यात ते शहीद झाले. भामरागड येथे 2008 मध्ये कोंबडा बाजारात वरगटे नामक पोलिस खबऱ्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर गेल्या वर्षी कोरची तालुक्‍यातील कोटगुल येथील कोंबडा बाजारात पोलिस समजून एका शिक्षकाला नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केले.
नक्षलग्रस्त भागातील आठवडी बाजारात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात असतात याचाच फायदा घेत नक्षलवादी पोलिस तसेच पोलिस खबऱ्यांना आपले टारगेट करीत आहेत. गर्दीमुळे पोलिसांना प्रतिउत्तरादाखल गोळीबार करता येत नाही. तसेच त्यांना पळून जाण्यासाठी अडचण होत नाही. हा हल्ले करण्यामागचा नक्षलवाद्यांचा हेतू असल्याचे आजवरच्या घटनांवरून लक्षात येते.
पेरमिली येथील आठवडी बाजाराच्या अडचणीबाबत ठाणेदार मतकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जुन्या आठवडी बाजारात सुरक्षेची समस्या असल्याने तेथे बाजार भरवू नये, अशी तक्रार काही नागरिकांनी केली होती. त्या आधारे आम्ही ग्रामपंचायतीला सूचना केल्या. तेथे बाजार भरविण्यास आमची काहीच अडचण नाही असे त्यांनी सांगितले.

""दुर्गम भागात दळणवळांच्या साधनांचा अभाव आहे. त्यातच रस्ते व पूल नसल्याने नागरिक जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आठवडी बाजारात येत असतात. याशिवाय विचाराची देवाणघेवाण, नातेवाइकाच्या भेटीगाठी होत असतात. त्यामुळे बाजार आदिवासींच्या लोकजीवनाचा भाग बनला आहे. नक्षलवाद्यांकडून बाजारात हल्ल्याच्या घटना घडल्यामुळे बंदी किवा तो सुरक्षेच्या कारणावरून इतरत्र हलविणे योग्य नाही. पोलिस किवा त्यांच्या खबऱ्यांना बाजारात सुरक्षेची चिंता वाटत असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्यात''.
- ऍड. लालसू नगोटी जि. प. सदस्य भामरागड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com