
कारंजा (जि.वाशीम) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशभर संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे, संपूर्ण कुटुंब घरात बसले. मात्र, कारंजा येथील हिंदू-मुस्लिम महिलांनी घरी न बसता संचारबंदीचे काटेकोर पालन करून, मानवतेच्या दृष्टीने झटत आहेत. शहरातील गरजू नागरिकांच्या भावनांचा आदर करीत ‘ध्यास’ या संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य भोजन व्यवस्था करून दिली आहे. शिवाय, संकटकाळात हिंदू-मुस्लिम या सामाजिक ऐक्याचे सुद्धा दर्शन घडविले आहे.
आपला संपूर्ण देश कोरोना संकटाशी लढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली. नागरिकांनी घरात बसून राहणे देखील देशसेवाच आहे. मात्र, या काळात कुणी उपाशी सुद्धा राहू नये ही मानवता आहे. शहरातील हिंदू-मुस्लिम महिलांनी सेवाभावी संस्था म्हणून कार्यरत असलेल्या ‘ध्यास’ (एक न संपणारा प्रवास) या बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून खांद्याला-खांदा लावून कार्यरत आहेत. शहरातील गरजवंत नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. यामध्ये, ही महिला मंडळी दिवसाला 300 नागरिकांना दोन वेळेचे विनामूल्य जेवण शिस्तबद्ध आणि नियमांचे काटेकोर पालन करीत देत आहेत.
आपण देखील समाजाचा एक घटक आहोत. या सामाजिक उत्तरदायीत्वाच्या भावनेतून हे कार्य सुरू आहे. प्रथम संचारबंदीच्या काळात 100 गरजूंना भोजन पुरविले. परंतु, शासनाने पुन्हा संचारबंदीचा कालावधी वाढविला. त्यामुळे हा महिलावर्ग आपली घरची कामे आटोपून कुठलाही मोबदला न घेता आजमितीला दररोज 300 व्यक्तींचे दोन वेळचे जेवण धर्म, चालीरीती, हेवेदावे बाजूला सारत ऐक्याच्या भावनेने विनामूल्य पुरवीत आहेत.
फक्त सेवाभाव
सामाजिक बांधीलकी म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. शिवाय, अनेक मंडळी ‘ध्यास’ला मदत करीत आहे. हा कुठल्याही राजकारणाचा भाग नसून फक्त सेवाभाव आहे.
-पूनम बंग, ‘ध्यास’ संस्थेच्या पदाधिकारी
मोबदल्याविना श्रमदान
परिसरातील महिला मोबदल्याविना श्रमदान करीत आहेत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच आम्हाला कार्यकरण्याची प्रेरणा मिळत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास, वाढलेली जेवनाची मागणी देखील आम्हाला पूर्ण करता येईल.
-आशीष गावंडे, समाजसेवक, कारंजा
अविश्रांत राबणारे हात....
पूनम बंग, रोशनी रेवाळे, शबाना अजीम शाह, मेघा पेटकर, शैलजा पेटकर, तृप्ति सावजी, नलिनी विभूते, मीरा पानझाडे, नलिनी विभूते, आदी महिलांसह आशिष गावंडे, संजय चौधरी आदी मंडळी सेवा देण्यास आघाडीवर आहेत. केवळ मानवतेच्या दृष्टीने हे हात अविश्रांत राबत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.