खरेदी केंद्रावर 32 हजार क्विंटल धान पडून, चुकारेही थकले, सांगा शेतकऱ्यांनी करावे तरी काय?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

एकीकडे शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करीत आहे; तर दुसरीकडे कोरोना विषाणूच्या दहशतीत जगत आहे. खरीप हंगामात उत्पादित झालेल्या धानाची विक्री शेतकरी जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर करीत आहे. नाकाडोंगरी येथील खरेदी केंद्रावर अनेक शेतकऱ्यांनी आपले धान विकले. मात्र त्यांचे चुकारे अद्याप मिळाले नाही. तसेच खरेदी केलेले धान उघड्यावर पडून असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

तुमसर (जि. भंडारा) : जिल्ह्यातील आंतरराज्यीय सीमा भागात असलेल्या नाकाडोंगरी येथील आधारभूत खरेदी केंद्रावर आतापर्यंत 42 हजार 210 क्विंटल धानाची खरेदी झाली खरी; परंतु त्यापैकी फक्त 10 हजार क्विंटल धानाचीच उचल झाल्याने उर्वरित 32 हजार क्विंटल धान शिल्लक आहेत.

 

परिणामी गोदामे तुडुंब भरून असल्याने शेतकऱ्यांचे धान उघड्यावर बाहेर पडून आहेत. तसेच शेतकऱ्यांचे मार्च महिन्यातील धान खरेदीचे चुकारेसुद्धा थकीत आहेत.

 

धानाच्या खरेदीला सहा महिन्यांचा काळ

धानाला योग्य भाव मिळावा, यासाठी शासनातर्फे शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. यावर्षी भरघोस उत्पन्न झाल्याने तुमसर तालुक्‍यात एकूण 19 धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. नाकाडोंगरी येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या धानखरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. आता धानाच्या खरेदीला सहा महिन्यांचा काळ लोटला; परंतु या केंद्रावरील धानाची उचल मात्र झालेली नाही.

चुकारे खात्यावर जमा करा

या केंद्राला जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी 50 हजार क्विंटल धानखरेदी करण्याची परवानगी दिली होती. केंद्रावरील 42 हजार 210 क्विंटल धानापैकी 10 हजार क्विंटलची उचल केली; तर 32 हजार क्विंटल धान केंद्रावरच पडून आहेत. विक्रीनंतर सात दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे चुकारे त्यांच्या खात्यावर जमा करावे, असा आदेश आहे. मात्र महिना उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

जाणून घ्या : या जिल्ह्यात नाही एकही कोरोनाचा रुग्ण! खबरदारी मात्र पूर्ण

शिवसेना शिष्टमंडळाने दिली भेट

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात 17 मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. या परिस्थितीत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तालुक्‍यातील धान खरेदी केंद्रावर शिवसेना शिष्टमंडळाने मंगळवारी भेट दिली. त्याठिकाणी विविध प्रकारच्या समस्या आढळून आल्या. यासंदर्भातील संपूर्ण माहिती पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, विधानसभा संघटक शेखर कोतपल्लीवार, विभागप्रमुख अमित मेश्राम, शाखाप्रमुख वामन पडोळे, मनोहर गायधने, शेतकरी ओमप्रकाश कापगते, अर्जुन बाविस्ताले, राधेश्‍याम बोरकर, कार्तिक कापगते, जयनारायण गौपाले, रवी नागपुरे उपस्थित होते.

गोदामाची व्यवस्था करा
नाकाडोंगरी येथील शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रावर गोदाम उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान बाहेर ठेवण्यात आले आहेत. खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यासाठी गोदामाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- विजय वाघाडे
ग्रेडर, आधारभूत खरेदी केंद्र, नाकाडोंगरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 quintals paddy at grain purchase centre bhandara