esakal | लग्नघरातच संपूर्ण कुटुंबाचा अंत; अंगाची हळदही न निघालेल्या दाम्पत्याचाही मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

couple

लग्नघरातच संपूर्ण कुटुंबाचा अंत; हळदही न निघालेल्या दाम्पत्याचाही मृत्यू

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

चंद्रपूर : आतुरतेने वाट पाहत असलेला विवाह सोहळा जवळ आला. घरासमोर मंडप उभारला. हाताला मेहंदी अन् अंगाला हळद लागली. अखेर २८ जून उजाडला अन् लग्नही झालं. सुखी संसाराचे स्वप्न बघत लग्नानंतरचे सर्व धार्मिक विधी सुरू होते. अंगाची हळदही निघाली नव्हती तर काळाने कुटुंबावर घाला घातला. त्यात नुकतीच संसाराला सुरुवात करणार असलेल्या दाम्पत्यालाही काळाने हिरावून नेलं. ज्या घरातून दहा दिवसांपूर्वी हसत-खेळत लग्नाची वरात निघाली होती, आज त्याच घरात एक नव्हे तर तब्बल ६ मृतदेह पडले होते. ही हृदयद्रावक घटना घडली चंद्रपुरातील दुर्गापूर (durgapur chandrapur) या गावात. (6 died including newly weds couple in chandrapur)

हेही वाचा: सेना, राष्ट्रवादींवर पटोलेंचे आरोप, नंतर घुमजाव; म्हणाले...

दुर्गापुरातील अजय लष्कर (२१)चे नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील माधुरी (२०)हिच्याशी लग्न जुळले होते. घरात पाहुण्यांची रेलचेल होती. हळद, मेहंदीपासून सर्व कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडले. २० जूनला अजय अन् माधुरीचं शुभमंगल झालं. लग्नानंतरच्या विधी सुरू होत्या. त्यासाठी नवदाम्पत्याचा चंद्रपूर ते कोराडी असा प्रवास सुरू होता. नवदाम्पत्य कार्यक्रमासाठी नवीन वधुच्या माहेरी कोराडीला गेले होते. कार्यक्रम आटोपला आणि लष्कर कुटुंब सोमवारी दुर्गापुरातील निवासस्थानी परतले. सर्वांनी रात्रीचे जेवण केले. त्यानंतर लग्नाच्या गंमतीजमती आठवत, किस्से आठवत सर्वांच्या गप्पा रंगल्या. यादरम्यान, परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे घरात असलेले जनरेटर लावून लष्कर कुटुंबीय झोपी गेले. पण, ही अखेरची झोप होती हे कुठं त्यांना माहिती होतं. एकदा झोपलेलं लष्कर कुटुंब सकाळ होऊनही उठलंच नाही. ज्या घरात सकाळ होताच सर्वांची रेलचेल असायची आज त्या घराचे दरवाजे मात्र बंद होते. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला. पण, कोणीच हाकेला ओ देईना. शेवटी दरवाजा तोडला तर समोरचे दृश्य पाहून शेजाऱ्यांना धक्का बसला. समोर सात जण पडलेले होते आणि घरात वास पसरला होता. तो वास होता जगरेटरमधून झालेल्या वायूगळतीचा. सर्वांना तत्काळ विश्वास झाडे रुग्णालयात हलविण्यात आले. पण, तोपर्यंत खूप उशिर झाला होता. डॉक्टरांनी सहा जणांना तपासून मृत घोषित केले. पण, नशिब बलवत्तर होते. म्हणून एक जण सुखरूप बचावला.

मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश -

नुकताच घरात लग्नसोहळा पार पडल्याने लहान मुलं अतिशय आनंदात होती. मात्र, त्यांचा आनंद पाहवला नाही की काय त्यांच्यावरही काळाने घाला घातला. या गॅस गळतीमध्ये लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), अशा दोन बालकांचा मृत्यू झाला, तर ऐन तारुण्यात प्रवेश करणाऱ्या पूजा लष्कर (१४)या मुलीवरही काळाने झडप घातली, तर कुटुंबप्रमुख आणि नुकताच लग्न झालेल्या अजयचे वडील रमेश लष्कर (४५)यांचाही यामध्ये मृत्यू झाला. ज्या घरातून दहा दिवसांपूर्वी वरात निघाली त्याच घरातून आज सहा जणांचे मृतदेह पडले होते. हे दृश्य पाहून अख्ख्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

loading image