देशभरातील 60 युवा शोधग्राममध्ये 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 December 2019

पैसा आणि करिअर या शब्दांपलीकडे जाऊन विविध आव्हाने स्वीकारून समाजात सकारात्मक बदल घडविण्याची इच्छा असलेल्या युवांसाठी डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी 2006 मध्ये "निर्माण' ही शिक्षणप्रकिया विकसित केली.

गडचिरोली : "अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून सर्च (शोधग्राम) येथे "निर्माण'च्या दहाव्या सत्राचे पहिले शिबिर शुक्रवारपासून (ता.27) ते 4 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशातील 60 युवाशिबिरात "तारुण्यभान ते समाजभान' असा प्रवास करीत विविध विषयांवर मंथन करणार आहेत. 

सकारात्मक समाज घडविण्यासाठी "निर्माण'ची स्थापना

पैसा आणि करिअर या शब्दांपलीकडे जाऊन विविध आव्हाने स्वीकारून समाजात सकारात्मक बदल घडविण्याची इच्छा असलेल्या युवांसाठी डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी 2006 मध्ये "निर्माण' ही शिक्षणप्रकिया विकसित केली. "निर्माण'ची नऊ शिबिरे आतापर्यंत झाली असून दहाव्या सत्राचे पहिले शिबिर शुक्रवारपासून (ता. 27) सुरू होत आहे. 

 

अवश्‍य वाचा- हॉर्न नो ओके प्लीज; कर्णकर्कश आवाजाने प्रवासी त्रस्त 

 

36 युवक, 24 युवती होणार सहभागी 

माझा स्वधर्म कोणता, माझी लैंगिक ओळख काय, मी राहतो तो समाज नेमका कसा आहे, समाजाचे प्रश्‍न कोणते, मला ते कसे जाणवतात, सर्वत्र दिसणारी आर्थिक विषमता, शेती व शेतकऱ्यांचे प्रश्‍न यासह तरुणाईला ग्रासणाऱ्या अनेक प्रश्‍नांचा वेध या शिबिरात "तारुण्यभान ते समाजभान' या प्रवासात घेतला जाणार आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, बिहार, राजस्थान, पंजाब येथील अभियांत्रिकी, विधी शाखा, वैद्यकशास्त्र, पत्रकारिता, कला, वाणिज्य, समाजकार्य आदी क्षेत्रांतील 36 युवक व 24 युवती शिबिरात सहभागी होणार आहेत. 

डॉ. अभय बंग संवाद साधणार 

शिबिरादरम्यान "तारुण्यभान' या सदरात "माझ्या स्वचा स्वीकार', "कुटुंबीयांसोबत माझा संवाद' या विषयांवर चर्चा होणार आहे. युवकांना पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांवर डॉ. अभय बंग चर्चेतून संवाद साधणार आहेत. सामाजिक प्रश्‍नांचा शोध आणि वेध घेण्यासाठी ते प्रश्‍न डोळ्यांनी जवळून पाहत समजून घेणे गरजेचे असते. यासाठी हे युवा प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन गाव आणि तेथील समाज, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 youths throughout India came in Shodhgram