अहेरीत नागरिकांची आरोग्य तपासणी, 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेत आढळले 97 आयएलआय व सारीचे रुग्ण

टीम ई सकाळ
Friday, 25 September 2020

गडचिरोली जिल्ह्यात 40851 नागरिकांच्या तपासणीनंतर समोर आलेल्या 97 आयएलआय व सारीच्या लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. अशाच प्रकारे प्रत्येक नागरिकाची तपासणी करून वेळेतच संबंधितांना उपचार सेवा दिली जाणार आहे.

गडचिरोली - कोरोना प्रतिबंधासाठी सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रारंभ केली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खुर्चीत बसून आदेश न देता स्वत: या मोहिमेत सहभागी घेतला. तसेच अहेरी येथे नागरिकांची तपासणी केली. यामध्ये आढळले 97 आयएलआय व सारीचे रुग्ण आढळले. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत: मैदानात उतरल्याने इतरांचाही उत्साह वाढला आहे. 

अहेरी तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्र महागावअंतर्गत नवेगाव उपकेंद्रातील किष्टापूरला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट दिली. तसेच काही नागरिकांची प्रत्यक्ष तपासणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना पथकातील कोरोनादूतांना सहकार्य करा, असे आवाहन केले. नागरिकांच्या आरोग्यासाठी, त्यांना कोरोना होऊ नये म्हणून हे कोरोनादूत आपल्या दारात येत आहेत. त्यांना योग्य माहिती देऊन कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी प्रशासनाला मदत करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

सावधान! जनावरांपासून मानवाला ‘सीसीएचएफ’ नावाच्या रोगाचा धोका; उपचार आणि निदानाअभावी 30...

आशीर्वाद यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गृहभेटी दिल्या. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावेल. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडीसेविका उपस्थित होत्या. आजपर्यंत जिल्ह्यात 668 पथकांनी 11558 कुटुंबापर्यंत पोहोचून 40851 नागरिकांची तपासणी केली व त्यांना आरोग्यविषयक शिक्षण दिले. जिल्ह्यात मोठ्या संख्येने आशावर्कर या मोहिमेत सहभागी आहेत. राज्य शासनाची महत्त्वाची मोहिम म्हणून याकडे पाहिले जाते. यात स्थानिक स्वयंसेवकांसह आशा, आंगणवाडीसेविका तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी काम करत आहेत.

कोरोना विरुद्धची लढाई सुरूच आणि उंबरठ्यावर आणखी एक!

जिल्ह्यात 40851 नागरिकांच्या तपासणीनंतर समोर आलेल्या 97 आयएलआय व सारीच्या लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. अशाच प्रकारे प्रत्येक नागरिकाची तपासणी करून वेळेतच संबंधितांना उपचार सेवा दिली जाणार आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात लॉकडाऊन राहिले नाही. बहुतांश नागरिक काळजी न घेता वावरत आहेत. मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, हात वारंवार स्वच्छ न धुणे या नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या वाढत आहे. मृत्यूसाठी तर वयाचे बंधनसुद्धा राहिले नाही. 

आपली जबाबदारी ओळखून किमान स्वत:साठी व आपल्या कुटुंबासाठी कोणतीही माहिती लपवू नका, असे आवाहन त्यांनी केले. घरात को-मॉरबीड नागरिक असेल किंवा एखाद्याला आयएलआय, सारी आणि कोरोनासदृश्‍य लक्षणे असतील तर त्याची माहिती पथकाला द्या. जेणेकरून मृत्युदर कमी करण्यात यश येईल. आपण माहिती लपविली तर आपल्याच कुटुंबाचे नुकसान होणार आहे, याची जाणीव ठेवा. ही मोहीम यशस्वी करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे मोहिमेच्या यशस्वीतेकरिता प्रत्येकाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर करणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे, हीच सध्या कोरोनावर मुख्य औषध आहे. सर्वेक्षण करताना आयएलआय, सारी, को-मॉरबीड नागरिकांचा डाटा व्यवस्थित भरा, असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 97 ili and sari patients found in aheri of gadchiroli