esakal | विनोद शिवकुमारच्या जामिनावर आज सुनावणी ; चार दिवसांपासून मध्यवर्ती कारागृहात

बोलून बातमी शोधा

deputy forest ranger vinod shivkumar
विनोद शिवकुमारच्या जामिनावर आज सुनावणी
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

अमरावती : वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. गेल्या चार दिवसांपासून शिवकुमारला मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य इमारतीत हलविण्यात आले आहे.

मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी धारणी पोलिसांनी २५ मार्च २०२१ रोजी शिवकुमारविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २६ मार्च रोजी शिवकुमारला नागपूर येथून अटक झाली होती. चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याला मध्यवर्ती कारागृहाच्या अंध विद्यालयातील अस्थायी कारागृहात ठेवण्यात आले होते. आता त्याचा अस्थायी कारागृहाचा कालावधी पूर्ण झाला आहे.

आरोग्यविषयकसुद्धा काहीच तक्रार नव्हती. त्यामुळे शिवकुमारला चार दिवसांपासून मुख्य कारागृहात हलविण्यात आले. नियमित प्रक्रियेचा हा भाग असल्याचे कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी सांगितले.

कारागृहात असताना शिवकुमारने अचलपूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्याच्या जामिनावर १५ एप्रिल रोजी सुनावणी अपेक्षित होती; मात्र चार दिवस न्यायालयास सुट्टी असल्याने ही सुनावणी लांबली. पोलिसांनी सोमवारी (ता. १९) न्यायालयात से दाखल केला. त्यावर अंतिम सुनावणी आज होण्याची शक्‍यता जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी व्यक्त केली.

नियमबाह्य कामाच्या आरोपाची चौकशी

मेळघाट व्याघ्रप्रकल्पात कामे करण्यासाठी फाउंडेशनची स्थापना झाली होती. त्याअंतर्गत काही नियमबाह्य कामे करण्यात आली, असा आरोप अनेक संघटनांनी केला. परंतु त्या कामांची चौकशी खऱ्या अर्थाने सुरूच झाली नाही. त्यामुळे कोट्यवधींचा निधी कशा पद्धतीने खर्च झाला, याबाबत संभ्रम कायम आहे.