esakal | चार दिवसांचे आश्वासन ७२ तासांतच पूर्ण; हल्लेखोर वाघ जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

चार दिवसांचे आश्वासन ७२ तासांतच पूर्ण; हल्लेखोर वाघ जेरबंद

चार दिवसांचे आश्वासन ७२ तासांतच पूर्ण; हल्लेखोर वाघ जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

झरी जामनी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील पिवरडोलसह परिसरातील नागरिकांना भयभीत करून सोडणाऱ्या हल्लेखोर वाघाला रेस्क्यू टीमने अवघ्या ७२ तासांत जेरबंद केले. त्या वाघाला बेशुद्घ केल्यानंतर कुठे हलविण्यात जाणार, हे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. (A-tiger-has-been-trapped-for-killing-a-youth-at-Pivardol-in-Yavatmal-district)

झरी तालुक्यातील पिवरडोल येथे वाघाने शुक्रवारी (ता. नऊ) युवकावर हल्ला चढविला होता. यात अविनाश पवन लेनगुरे (वय १७) याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. वाघाचे लोकेशन घेण्यासाठी वनविभागाने विभागातील सातही क्षेत्रातील तीन पथके तयार केली होती. यात वन कर्मचारी, वनमजूर पिवरडोलच्या आसपास तैनात करण्यात आले. पिवरडोल येथे पेंच येथील एक व अमरावती, बुलढाणा येथील दोन चमू रविवारी (ता. ११) दाखल झाल्या होत्या.

या चमूंनी सोमवारी सकाळपासूनच वाघ नेमका कोणत्या परिसरात आहे, याचा शोध सुरू केला. प्रत्येक चमू आपापली जबाबदारी सांभाळून होती. जागोजागी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. मचाणी उभारण्यात आल्या होत्या. त्यावरून वाघाचे लोकेशन घेण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यातच एका चमूला वाघाच्या पंजाचे ठसे दिसले. त्याचा माग घेतघेत चमू वाघापर्यंत पोहोचली. त्यानंतर त्याला बेशुद्घ करून जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

हेही वाचा: सेना, राष्ट्रवादींवर पटोलेंचे आरोप, नंतर घुमजाव; म्हणाले...

पावसामुळे थोडाफार व्यत्ययदेखील येत होता. परंतु, हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याची मोहीम अवघ्या काही तासात फत्ते झाली. पिवरडोलवासींना वाघाचा चार दिवसांत बंदोबस्त करण्यात येईल, हे आश्वासन ७२ तासांतच पूर्ण करण्यात आले. वाघाला जेरबंद करण्यात आल्याने नागरिक काही प्रमाणात भयमुक्त झाले आहेत.

(A-tiger-has-been-trapped-for-killing-a-youth-at-Pivardol-in-Yavatmal-district)

loading image