esakal | मानधन वाढीसाठी आशांचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : मानधनवाढीच्या मागणीसाठी संविधान चौकात निदर्शने देताना आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे सदस्य.

मानधन वाढीसाठी आशांचे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आशा सेविकांना तिप्पट मानधन देण्याचे आश्‍वासन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. मात्र, अद्याप आशांना मानधनवाढ मिळालेली नाही. त्वरित मानधनवाढ मिळावी, त्यासंदर्भात शासन निर्णय काढून निर्गमित करावे या मागणीसाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी मंगळवारी संविधान चौकात आंदोलन करीत जोरदार निदर्शने दिली.
आशांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या सरासरी 2,500 रुपये दरमहा मानधन मिळते तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासिक 8,724 रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशी कृती समितीची मागणी आहे. गटप्रवर्तक आशा स्वयंसेवकांना मिळणारे मानधन हे दारिद्य्ररेषेखालील व किमान वेतनाखालील असून, त्यांना वेठबिगारासारखे वागविले जाते. प्रवर्तक, आशा स्वयंसेवकांना शासकीय सेवेत कायम करेपर्यंत अंगणवाडी सेविकेएवढे तरी मानधन मिळाले पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता असल्याने आशांचा प्रश्‍न त्वरित सोडवावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. मागण्या मान्य होत नाही तोवर आशा व गटप्रवर्तकांनी बेमुदत संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे.

loading image
go to top