अभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त

अभिजित बांगर
अभिजित बांगर

अभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त
नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात अमरावतीचे जिल्हाधिकारी बांगर यांचाही समावेश आहे. महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंग यांची कौशल्य विकास, रोजगार व उद्योजिकता आयुक्तपदी बदली करण्यात आली.
नवनियुक्त आयुक्त बांगर उद्या शहरात येणार आहेत. गुरुवारी रुजू होणार असल्याचे त्यांनी "सकाळ'सोबत बोलताना सांगितले. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही "रामगिरी' येथे दिवाळी मिलन कार्यक्रमात महापालिकेला लवकरच आयुक्त येतील, असे स्पष्ट केले होते. महापालिकेत गेल्या दोन महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे यांच्याकडेच आयुक्तपदाचा प्रभारी कारभार आहे. आयुक्त वीरेंद्र सिंग यांच्या बदलीची दोन महिन्यांपासून तर अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची महापालिकेत आयुक्तपदी बदली होणार असल्याची चर्चाही मागील पंधरा दिवसांपासून रंगली होती. अखेर आज सरकारने त्यांची बदली करीत चर्चेला पूर्णविराम दिला. 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अभिजीत बांगर मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील असून अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य बार्शी येथे होते. त्यांनी पुणे येथे अर्थशास्त्रात एम. ए. केले आहे. काही काळ त्यांनी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांनी नागपूर येथे जिल्हा सहायक अधिकारी, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. रायगड, सातारा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी प्रत्येकी दोन वर्षे काम केले आहे. पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट 2014 मध्ये पदभार स्वीकारला. मागील वर्षी ते अमरावती जिल्हाधिकारीपदी रुजू झाले होते.

वीरेंद्र सिंगांना भोवला सत्ताधाऱ्यांशी वाद
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांशी वाद वीरेंद्र सिंग यांना भोवल्याची चर्चा रंगली आहे. आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी आर्थिक संकट बघता विकास कामांच्या खर्चात कपात केली होती. यातूनच वादाची ठिणगी पडली. त्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्यात स्पष्ट नकार दिला. 3 सप्टेंबर रोजी ते आईच्या प्रकृतीच्या कारणावरून रजेवर गेले होते. 20 ऑक्‍टोबरला ते नागपुरात आले. 21 ऑक्‍टोबरला ते शहरात दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसले. 22 ऑक्‍टोबर ते महापालिकेत रुजू न होता मुंबईला गेले होते. या घडामोडीमुळे त्यांची बदली निश्‍चित समजली जात होती.

देशमुख अमरावतीचे जिल्हाधिकारी
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांची बदली अमरावती जिल्हाधिकारीपदी झाली. रुपेश जयवंशी यांची हिंगोली जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. हिंगालीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com