हुंडीवाले हत्याकांड : फरार आरोपीच्या कर्नाटकातून मुसक्या आवळल्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

शैक्षणिक संस्थेच्या कारणावरून झालेल्या वादातून किसनराव हुंडीवाले यांच्या डोक्यात अग्निरोधक सिलिंडर मारून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृतक हुंडीवाले यांचा मुलगा प्रवीण हुंडीवाले यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांत तक्रार दिली होती.

अकोला : अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी मोहम्मद साबीर यास सिव्हिल लाईन्स पोलिसांनी शनिवारी (ता.29) कर्नाटक राज्यातील बीदर येथून अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या हत्याकांडातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.

स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ कौलखेड या शैक्षणिक संस्थेच्या कामानिमित्त किसनराव यमाजी हुंडीवाले (वय 65) हे 6 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास न्यास नोंदणी कार्यालयात आले होते. यावेळी शैक्षणिक संस्थेच्या कारणावरून झालेल्या वादातून किसनराव हुंडीवाले यांच्या डोक्यात अग्निरोधक सिलिंडर मारून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृतक हुंडीवाले यांचा मुलगा प्रवीण हुंडीवाले यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर 7 मे रोजी श्रीराम कसदन गावंडे, विक्रम उर्फछोटू श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे हे पोलिसांना शरण आले होते. 

महत्त्वाची बातमी - सैनिकांच्या नावाचा अकोल्यात गैरवापर; कागदपत्रेही बनावट

अद्यापही दोन आरोपी फरार
त्यानंतर 9 मे रोजी पोलिसांनी रणजित श्रीराम गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिर, प्रतीक दत्तात्रय तोंडे, दिनेश बादलसिंह ठाकूर यांना अटक केली होती. सध्या या प्रकरणातील धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, रणजित श्रीराम गावंडे आणि विक्रम श्रीराम गावंडे हे आरोपी कारागृहात असून, मंगेश श्रीकृष्ण गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे आणि मोहम्मद साबीर हे तीन आरोपी फरार होते. यातील मोहम्मद साबीर यास कर्नाटक राज्यातील बीदर येथून अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील मंगेश श्रीकृष्म गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे हे अद्यापही फरार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absconding accused arrested in Karnataka