esakal | माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, नाही तर तुला जाळतो; त्याने दिली धमकी 
sakal

बोलून बातमी शोधा

following girl

गोलू नेहमीच मोबाइलवर "मी तुझ्यावर प्रेम करतो' असे म्हणून त्या तरुणीला त्रास देत होता. तसेच वाईट उद्देशाने तिचा पाठलागही करायचा.

माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, नाही तर तुला जाळतो; त्याने दिली धमकी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : तरुणी महाविद्यालयामध्ये मैत्रिणींसोबत बोलत उभी असताना एका तरुणाने अचानक येऊन तिचा हात पकडला. मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रेमाचा स्वीकार न केल्यास मी तुला हिंगणघाटमधील घटनेप्रमाणे जाळून मारणार, अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी येथील एका महाविद्यालयामधील सायकल स्टॅण्डजवळ घडली. 

गोलू नामदेव जाधव (वय 23, रा. खैरगाव तांडा) असे संशयित तरुणाचे नाव आहे. हा तरुण पीडितेच्या काकूचा नातेवाईक असल्याने दोघांची ओळख झाली. गोलू नेहमीच मोबाइलवर "मी तुझ्यावर प्रेम करतो' असे म्हणून त्या तरुणीला त्रास देत होता. तसेच वाईट उद्देशाने तिचा पाठलागही करायचा. 28 फेब्रुवारीला ती विद्यार्थिनी महाविद्यालयामधील सायकल स्टॅण्डजवळ मैत्रिणींसोबत बोलत उभी होती. दरम्यान, गोलू जाधव तेथे आला आणि तिचा हात पकडला. "मी तुझ्यावर प्रेम करतो, तू प्रेमाचा स्वीकार न केल्यास तुला हिंगणघाटमधील घटनेप्रमाणे जाळून मारणार', अशी थेट धमकी देत विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली. 

अवश्य वाचा- गाव लई न्यारं... महिला खुर्चीवर बसून पितात चहा, अन् पतीला म्हणतात...

चिंता वाढविणारी बाब

पीडितेने शनिवारी (ता. सात) अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून संशयित गोलू जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. हिंगणघाट येथे प्राध्यापिका असलेल्या तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. मात्र, या घटनेपासून बोध घेण्याऐवजी माथेफिरू तरुण "हिंगणघाटप्रमाणे जाळून मारणार', असा शब्दप्रयोग करीत आहेत. ही बाब चिंता वाढविणारी आहे.