वडिलांसोबत तो सायकलने येत होता, मात्र असे काही घडले की....

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

अमन येथील पंचफुलाबाई हरणे विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता. अभियंता व्हायचे आहे, असे अमनने विद्यालयाच्या पर्यवेक्षिका जयश्री कळमकर यांच्याजवळ एकदा बोलताना सांगितले होते.

भंडारज (जि. अमरावती)  : अंजनगावसुर्जी येथील जुन्या बसस्थानकासमोर कांद्याने भरलेल्या ट्रकने सायकलने जाणाऱ्या मुलास चाकाखाली चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (ता. 15) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अमनने अभियंता होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. 

अमन संजय रेखाते (वय 14, रा. रूपलालनगर) असे अपघातातील मृत मुलाचे नाव आहे. 27-बी एक्‍स 4555 क्रमांकाचा ट्रक रिव्हर्स घेत असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे येथील काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळा बंद असल्याने वडील संजय रेखाते यांच्यासोबत अमन सोमवारी (ता.15) सायकलने शेतात गेला होता. दोघेही वेगवेगळ्या सायकलींवरून शेतातून घरी येत होते. शिवभोजन केंद्रातून ते पुढे निघाले. अंजनगाव-अकोट रोडवरील जुन्या बसस्थानकासमोरील ऑटोमोबाईल समोर कांद्याने भरलेला ट्रक समोर गर्दी असल्यामुळे रिव्हर्स घेत असताना अमनच्या सायकलला धडक बसली अन्‌ चाकाखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. जमाव जमल्याने वाहन तेथेच सोडून चालक व क्‍लिनरने पळ काढला. सायकलस्वारास धडक देणारा ट्रक पथ्रोट येथील असल्याचे समजते. 

अवश्य वाचा-  साडेतीन लाख द्या अन्यथा व्हिडीओ करतो व्हायरल... त्यांनी दिली विवाहितेला धमकी 

अमन येथील पंचफुलाबाई हरणे विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता. अभियंता व्हायचे आहे, असे अमनने विद्यालयाच्या पर्यवेक्षिका जयश्री कळमकर यांच्याजवळ एकदा बोलताना सांगितले होते. अपघातामुळे अभियंता होण्याचे अमनचे स्वप्न अधुरे राहिले. विद्यालयाचे प्राचार्य सुनील टांक, संस्थाध्यक्ष जगन हरणे, पर्यवेक्षिका जयश्री कळमकरसह इतरांनी शोक व्यक्त केला. 

अमन इन्व्हर्टर केले होते तयार 

हरणे विद्यालयाच्या पर्यवेक्षिकांकडून जुनी बिघडलेली मॉस्किटोबॅट घेऊन गेला व तब्बल सहा तास चालणारे व भरपूर प्रकाश देणारे इन्व्हर्टर तयार करून त्याने शिक्षिकेला आणून दाखविले होते. त्याबद्दल त्याचे बरेच कौतुकही झाले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the accident a 14 years boy killed. He wants to become an Engineer