यवतमाळ : कळंबजवळ शिवशाही-टेम्पोची धडक; टेम्पोचालक जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

शिवशाही बसमधील काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या असून, त्यांच्यावर कळंब येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कळंब (जि. यवतमाळ) : यवतमाळहून नागपूरला जाणारी शिवशाही बस (क्रमांक एम. एच. 29 बीइ 1064) व कळंबकडून यवतमाळकडे येणार्‍या मालवाहू 407 मेटॅडोरची (क्रमांक एमएच 24 जे 6063) समोरासमोर धडक होऊन त्यात मेटॅडोरचालक जागीच ठार झाला. यात बसचालकही जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज (गुरुवार) दुपारी दोनच्या सुमारास येथून दहा किलोमीटर असलेल्या चापर्डा गावाजवळ झाला.

शंकर धोंडराम अलट (वय 45, रा. चाकूर जि. लातूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या मेटॅडोरचालक व मालकाचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण झाला की, शिवशाही बस महामार्गावरील बाजूच्या डिवाइडरवर जाऊन चढली, तर मेटॅडोरची संपूर्ण केबिन जाम होऊन चालक स्टेरिंगमध्ये फसला होता. हा अपघात महामार्गावरील एकच मार्ग सुरू असल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार विजय चव्हाण आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात शिवशाही बसचा चालक गंभीर जखमी असून, त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवशाही बसमधील काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या असून, त्यांच्यावर कळंब येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मदतीसाठी धावले मंडळाचे कार्यकर्ते
नवचैतन्य दुर्गा उत्सव मंडळ व कळंबचे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी या अपघातानंतर जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याच्या मदतकार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. मंडळाचे गणेश खंदारे, सचिन जोगे, वैभव वाघाडे, मंगेश टेकाम यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident between Shivshahi bus and cargo tempo near Kalamb