दिंडी मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच; प्रशासन जागणार तरी कधी?

dindi accident.jpg
dindi accident.jpg

खामगाव (जि.बुलडाणा) : आषाढीला दिवे घाटातील दिंडी अपघाताच्या घटनेत दोन वारकरी ठार झाले होते, या दुःखातून वारकरी सावरत नाही तोच शुक्रवारी (ता.14) रात्री शेगाव-अकोट रस्त्यावर टिप्परच्या धडकेत दोन वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने अलीकडच्‍या काही वर्षांत झालेल्‍या पालखी, दिंडी व पदयात्रेतील अपघातांच्‍या घटना व त्यात जाणारे वारकऱ्यांचे हकनाक बळी हा संवेदनशील मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राज्यात विविध तीर्थ क्षेत्रांना जाणाऱ्या हजारो भाविकांच्‍या सुरक्षिततेबाबत प्रशासन उदासीन असल्‍याने दिसून येते. प्रगट दिनानिमित्त संत नागरी शेगाव येथे मोठ्या संख्येने दिंड्या व पायदळ वारी करत भक्त शेगावात दाखल झाले. दरम्यान शुक्रवारी रात्री शेगाव-अकोट रस्त्यावर लोहारा फाट्यानजीक टिप्परच्या धडकेत दोन वारकरी ठार झाले. या दुर्दैवी घटनेनंतर वारकरी संप्रदाय व भक्त शोकछाया पसरली असून, दिंडीमध्ये होणाऱ्या अपघाताबाबत चिंता सुध्दा व्‍यक्‍त होतांना दिसते. 

वारकऱ्यांच्‍या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर
अपघाताची घटना ही वरकरणी नेहमीप्रमाणे होणाऱ्या रस्‍ते अपघातासारखी असली तरी या घटनेच्‍या निमित्‍ताने पदयात्रा, दिंडी व पालखी सोहळ्यांमध्ये पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्‍या सुरक्षिततेबाबतचा प्रश्‍न किती गंभीरतेने घेतला पाहिजे हे पुन्‍हा एकदा दिसून आले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्‍हणून ओळखल्‍या जाते. दरवर्षी आषाढी, कार्तिकी एकादशी, गुरुपौर्णिमा, श्रीराम नवमी, ‘श्रीं’चे प्रगटदिन या उत्‍सवांसाठी राज्‍यातील पंढरपूर, शिर्डी, आळंदी, शेगाव या महत्त्‍वाच्‍या तिर्थक्षेत्राची पायी वारी अनेक दिंड्या व हजारो वारकरी करीत असतात. त्‍यामुळे नेहमी होणाऱ्या दिंडीतील अपघाताच्‍या घटना वारकऱ्यांसाठी चिंतेचा विषय तर आहेतच मात्र प्रशासन वारकऱ्यांच्‍या सुरक्षेबाबत उदासीन असल्‍याचे यातून दिसून येते. 

या करता येतील सुविधा
ज्‍या मार्गावरुन पालख्या मार्गक्रमण करत असतील तशा मार्गावरील वाहतूक अन्‍य मार्गाने वळवणे, जड वाहनांना बंदी, वन-वे करणे, संबंधित मार्गांवर पोलिसांची गस्‍त, भाविकांना स्‍वयंशिस्‍तीबाबत मार्गदर्शन व माहिती दिल्‍यास असे अपघात टळू शकतात. त्‍यामुळे महाराष्ट्राची वारी पंरपरा दुर्घटनेविना कशी अविरत सुरू राहिल याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. वारकरी व भक्‍तांच्‍या वाहन अपघातात तर शेकडो बळी गेलेले आहेत. या घटनांमधून भाविक, वारकऱ्यांचे हकनाक बळी जात असल्‍याने चिंता व्‍यक्‍त होतांना दिसते.

अलीकडच्या काळातील दुर्दैवी अपघात

  • 25 जुलै 2017 : शेगाव येथील पालखी पंढरपूर येथून परत येत असताना अंबड तालुक्‍यातील पारनेर ट्रकने धडक दिल्‍याने चौदा वारकऱ्यांचा चिरडून मृत्‍यू झाला होता. तर अनेक वारकरी जखमी झाले होते.
  • 11 डिसेंबर 2017 : मुंबईहून साईबाबांच्‍या दर्शनाला येणाऱ्या दिंडीला 11 डिसेंबर 2017 रोजी ईगतपुरी येथील भाविकाचा मृत्‍यू झाला होता.
  • 5 फेब्रुवारी 2018 : शेगावला पायी येणाऱ्या वाशीम जिल्‍ह्यातील उमरा कापसे गावातील दिंडीला अकोल्‍यानजिक पातूर-बाळापूर रस्‍त्‍यावर बाग फाट्याजवळ ॲपेरिक्षाला अपघात होऊन चार वारकऱ्यांचा मृत्‍यू झाला होता.
  • 18 नोव्हेंबर 2019 : दिवे घाटातील वळणावर दिंडीत जेसीबी घुसून झालेल्‍या भीषण अपघातात संत नामदेव महाराजांचे तेरावे वंशज सोपान महाराज व शेगाव तालुक्यातील येऊलखेड अतुल महादेव आळशी यांचा मृत्‍यू . पंधरा वारकरी गंभीर.
  • 14 नोव्हेंबर 2020 : शेगाव येथे प्रगटदिन उत्सवाकरिता येत असताना अकोट तालुक्यातील पळसोड येथील विशाल पाटेकर व शाम तिवाने या वारकऱ्यांना टिप्परने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत्यू मनाला चटका लावून जातात
राज्यात धार्मिक उत्सव काळात दिंडी मार्गावरील अपघात हा विषय चिंतेचा बनत चालला आहे. वारकरी संप्रदायात दिंडी परंपरा अत्यंत महत्त्वाची असून, दिंडीत वारकऱ्यांचे अपघाती होणारे मृत्यू मनाला चटका लावून जातात. शासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात. तसेच अपघाती मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी.
-ज्ञानेश्वर महाराज मिरगे, शेगाव (ज्येष्ठ कीर्तनकार व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com