हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; दोघांचा मृत्यू, पाच जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

चंद्रपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाला कंटेनरने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी दोन जवानांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पाच जवान जखमी झाले. अहीर यांचे वाहन समोर निघून गेल्यामुळे सुदैवाने ते थोडक्‍यात बचावले. हा अपघात आज, गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील जामनजीकच्या कानकाटी शिवारात घडला.

हंसराज अहीर आज सकाळी दिल्लीला जाण्यासाठी सुरक्षा ताफ्यासह चंद्रपूरवरून नागपूर विमानतळाकडे निघाले होते. मार्गातील जामनजीकच्या कानकाटी शिवारात त्यांच्या ताफ्यातील एमएच 20- ई 1939 क्रमांकाच्या वाहनाला एचआर-55 ए 8870 क्रमांकाच्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात चालक विनोद विठ्ठल झाडे (वय 36, रा. चंद्रपूर) आणि फुलजीभाई पटेल गंभीर जखमी झाले. अहीर यांनी स्वतः जखमी दोघांनाही नागपूर येथील ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या वाहनात विनोद झाडे आणि फुलजीभाई पटेल यांच्यासह केंद्रीय सुरक्षा दलाचे विजयकुमार, जी. साजिद, जयदीप कुमार, प्रकाश भाई आणि बनवारीलाल रेगर होते. एएसआय विजय कुमार ऑरेंज सिटी नागपूर येथील अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. अपघातग्रस्त वाहन अहीर यांच्या वाहनाच्या मागे होते. अपघातानंतर अहीर यांनी दिल्ली दौरा रद्द केला. या घटनेची समुद्रपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Hansraj Ahir's coffin vehicle; Two died, five injured