पाणी घेण्यासाठी उतरल्या प्लॅटफॉर्मवर आणि चढताना झाला घात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

जेवण करायचे म्हणून पिण्याचे पाणी घेण्यासाठी मोना व दिव्या या दोघी उतरल्या. पाणी बॉटल भरेस्तोवर गाडी सुरू झाली. त्यांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. दिव्या गाडीत चढली. मात्र तोवर गाडीने वेग धरल्याने आरडाओरड झाली. चढू नकोस म्हणण्यापूर्वीच मोनाचा तोल जाऊन ती गाडीखाली आली व चाकाखाली येऊन तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : रिजर्व्ह बॅंकेत नोकरीला लागून गरिबीत जगणाऱ्या आपल्या आईवडिलांना आधार देण्याचे कळमेश्‍वरच्या मोना वसंत वाघमारे या 23 वर्षीय तरुणीचे स्वप्न निर्दयी काळाने बेचिराख केले. धामणगाव रेल्वे येथील फलाटावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरलेली मोना धावत्या रेल्वेगाडीखाली आली व क्षणात तिच्या शरिराचे तुकडे झालेत.

येथील रेल्वे फलाट क्रमांक दोनवर मंगळवारी (ता. 18) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. मृत मोना नागपूर शहरानजीकच्या फेटरी (ता. कळमेश्‍वर) येथील रहिवासी आहे. मोना भारतीय रिझर्व बॅंकेची परीक्षा देऊन सोमवारी (ता.17) मुंबईहून कुर्ला-अजनी (गाडी क्रमांक 02031) या विशेष रेल्वेगाडीने निघाली होती. नागपूर येथील शिकवणी वर्गातील तिच्या मैत्रिणी दिव्या सोनी (रा. हिंगणघाट), अश्‍विनी सुखदेवे (रा. फ्रेंड्‌स कॉलनी, नागपूर) यासुद्धा प्रवासात तिच्या सोबतीला होत्या.
प्रवासादरम्यान आज मंगळवारी (ता.18) रेल्वेगाडी धामणगावरेल्वे स्थानकावर थांबली.

निर्दयी काळाने मोनाच्या स्वप्नाचे केले तुकडे
जेवण करायचे म्हणून पिण्याचे पाणी घेण्यासाठी मोना व दिव्या या दोघी उतरल्या. पाणी बॉटल भरेस्तोवर गाडी सुरू झाली. त्यांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. दिव्या गाडीत चढली. मात्र तोवर गाडीने वेग धरल्याने आरडाओरड झाली. चढू नकोस म्हणण्यापूर्वीच मोनाचा तोल जाऊन ती गाडीखाली आली व चाकाखाली येऊन तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले.

धामणगाव स्थानकावरील घटना
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कामगार आकाश मार्वे, मनोहर परिहार, सागर मार्वे, कार्तिक परिहार यांच्या मदतीने मृतदेह तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. हवालदार रवी फुसाटे, अमोल पाटील तपास करीत आहेत.

स्वप्न... स्वप्नच राहिले!
मोना वाघमारे हिची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिचे वडील वेल्डिंगची कामे करतात. मुलीला उच्च पदावर पोहोचविण्यासाठी ते परिश्रम करीत होते. मोनाला भाऊ नसून तीन बहिणींमध्ये ती मोठी होती. लहान बहीण दिव्यांग असल्याने आईवडिलांचा भविष्यात आधार बनण्यासाठी अभ्यासू मोना बॅंकिंगच्या परीक्षेला सामोरे जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहत होती. परंतु या अपघातात मृत्यू झाल्याने तिचे स्वप्न फक्त स्वप्नच ठरले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident while traveling to Nagpur Amaravati