ते निघाले होते जिल्ह्याच्या बाहेर; चेकपोस्टवरच अडवले गेले; आता होणार कारवाई

check post.
check post.
Updated on

वर्धा  : सध्याच्या कोरोनाच्या बिकट स्थितीत अनेक शासकीय, निमशासकीय आणि बँकांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाल न सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अनेक कर्मचारी या आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून आले.
त्यामुळे सोमवारी (ता. 27) जिल्ह्यातल्या प्रमुख चेकपोस्टवर सकाळपासूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. या तपासणीत तब्बल 69 अधिकारी, कर्मचारी अपडाऊन करीत असल्याचे पुढे आले. या कर्मचाऱ्यांवर इतर कायद्यांसह सामूहिक एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने शासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या सेवेकरिता आणि जिल्ह्याची सुरक्षितता कायम राखण्याकरिता जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुस-या जिल्ह्यातून अपडाऊन करणे सुरूच होते. विशेष म्हणजे हे कर्मचारी कोरोनाचा संसर्ग असलेल्या जिल्ह्यातून ये-जा करीत होते. त्यांच्यामुळे केव्हाही जिल्ह्यात धोका निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.
याची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज सकाळी सात वाजतापासूनच जिल्ह्याच्या मुख्य चेकपोस्टवर पथक तयार करून ठिय्या दिला. यावेळी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून  आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवाय त्यांना शासनाचे आदेश तोडण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली. यात ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे जिल्ह्यात खरे काम आहे अशांनाच सोडण्यात आले तर ज्यांचे काम नाही त्यांना परत पाठविण्यात आले. सोडण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याची ताकीद देण्यात आली.
कार्यवाही होणार
शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून ये-जा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर मुख्यालयी राहण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एफआयआर दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुक्‍त जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेल्या नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातून अनेक कर्मचारी ये-जा करीत असल्याची माहिती होती. दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यात एक दिवसाकरिता गेलेल्या कर्मचाऱ्यांना केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. तर इतर कर्मचाऱ्यांवर नागरी सेवा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर सामूहिक एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.
 सुरेश बगळे
उपविभागीय अधिकारी, वर्धा

माहिती मिळताच अनेकजण पळाले
अपडाऊन करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या कारवाईची माहिती मिळाली असता ते चेकपोस्टकडे आलेच नाहीत. यामुळे त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. विशेषत: यात यवतमाळ येथील कर्मचारी असल्याची माहिती आहे.

सविस्तर वाचा - माहिती लपवित असल्याने महापालिकेने उचलले कठोर पाऊल; तब्बल इतक्या नागरिकांसोबत करणार असं...
मुख्यालय न सोडण्याचा आदेश                                                          जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या आरोग्य आणि पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांचाही या अपडाऊनमध्ये सहभाग आहे. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नसल्याचे सांगण्यात येत आहे. जे कर्मचारी अत्यावश्‍यक सेवेत आहेत त्यांच्या मुख्यालय सोडण्यावर बंदी घालण्याचा कडक निर्णय घेण्यात आला आहे.

खासगी आस्थापनांना बजावणार नोटीस
अपडाऊनच्या या प्रकारात अनेक खासगी सेवेतील कर्मचारी असल्याचे दिसून आले आहे.  विशेषत: बँक आणि काही शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी असल्याचे दिसून आले. या संदर्भात त्यांच्या आस्थापनांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com