Maharashtra vidhansabha 2019 ऍड. कुंभारे म्हणतात, कामठीतून बावनकुळे यांनाच उमेदवारी द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्याचा आपला विचार नाही. आपल्या नावाची होत असलेली चर्चा निरर्थक आहे. भाजपने ऊर्जामंत्री तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री तसेच बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष ऍड. सुलेखा कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

भाजपच्या कार्यकाळात सर्वाधिक विकासकामे होत आहेत. त्यातही कामठी विकासात सर्वाधिक आघाडीवर आहे. पाच वर्षांत इंदू मिलच्या जागेचा तिढा सोडवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला. बाबासाहेबांचे लंडनचे निवासस्थान विकत घेऊन त्यास स्मारकाचा दर्जा दिला आहे. बुद्धिस्ट सर्किट निर्माण केले. दिल्लीत डॉ. आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर स्थापन केले. दीक्षाभूमीलाही कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. कामठीच्या ड्रॅगन टेंपलला अलीकडेच राज्य सरकारने 214 कोटी उपलब्ध करून दिले. त्यामुळे बरिएमंने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत असल्याची घोषणाही यावेळी कुंभारे यांनी केली.
आमदार आणि मंत्री या नात्याने बावनकुळे यांची कामगिरी सर्वोत्तम आहे. त्यांना दुसऱ्या विधानसभेत पाठवणे कामठीतील जनतेवर अन्याय केल्यासारखे होईल. पंधरा वर्षांपासून ते कामठीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनाच कामठीतून उमेदवारी द्यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे कुंभारे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Add. Kumbhare says, only Bawanakule from Kamthi should nominate