व्यसनाधीन पित्याच्या अंगात संचारला राक्षस, मुलीवर केला चाकूहल्ला आणि स्वतः ...

मंगेश वाणीकर 
Wednesday, 5 August 2020

धर्मेंद्र याला दारूचे व्यसन होते. यातून त्यांच्या कुटुंबात नेहमीच वाद व्हायचे . त्याला दारू पिण्यास मनाई केली असता पत्नीला आणि मुलांना त्याने घरी राहण्यास मनाई केली होती.

हिंगणघाट (जि. वर्धा)  : व्यसनी माणसं कधी काय करतील याचा नेम नाही, दारूच्या नशेत त्यांना सख्ख्या नात्यांचाही विसर पडतो. अंगाचा थरकाप उडवणारी अशीच एक घटना हिंगणघाट येथे उघडकीस आली. पित्याने स्वतःच्या १९ वर्षीय मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

 

नेहमीच व्हायचा वाद...

सविस्तर वृत्त असे की, धर्मेंद्र परसागडे, वय 50, रा. गोमाजी वॉर्ड हे मुलीवर हल्ला करून स्वतःचे जीवन संपविणाऱ्या पित्याचे नाव आहे . जखमी पीडित मुलीची प्रकृती अत्यवस्थ असून, तिच्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने आपल्या पोलीस बयाणात दिलेल्या माहितीप्रमाणे, तिचे वडील धर्मेंद्र याला दारूचे व्यसन होते. यातून त्यांच्या कुटुंबात नेहमीच वाद व्हायचे . त्याला दारू पिण्यास मनाई केली असता पत्नीला आणि मुलांना त्याने घरी राहण्यास मनाई केली होती.

क्लिक करा -  नागपुरात डबल मर्डरचा थरार! पत्नीच्या अनैतिक संबंधावरून झाला वाद.. अखेर त्याने हाती घेतली कुऱ्हाड आणि...
 

भाड्याच्या घरी येऊन दमदाटी...

त्यामुळे त्याची पत्नी, पीडित मुलगी आणि मुलासोबत तेलंखेडी येथील एका भाड्याच्या घरी राहत होते. दरम्यान, तो अधून मधून मद्यधुंद अवस्थेत येऊन त्यांना धमकावत होता. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी घरी झोपलेली होती. तेवढ्यात तिचे वडील धर्मेंद्र तिथे आले व त्यांनी तिला उठवले .मला का उठवले असे तिने विचारले असता त्याने खिशातील चाकू काढून तिच्यावर हल्ला चढविला.  यात ती जखमी झाली . जखमी अवस्थेत मुलीला सोडून तो तिथून पसार झाला. तिच्या आईने तिला उपचाराकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथून तिला पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले. 

 

स्वतःही घेतला गळफास...

यादरम्यान पोलिस  मारहाण प्रकरणाचा तपास करण्याकरिता धर्मेंद्र परसागडे याचे घरी आले असता ते गळफास घेऊन मृतावस्थेत लटकलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली असून, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटणकर परमेश्वर आगाशे, वीरेंद्र कांबळे पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Addicted father attacks daughter, then commits suicide