गडचिरोलीत पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले प्रशासन 

गडचिरोलीत पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले प्रशासन 

भामरागड (गडचिरोली) - महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व अनेक समस्यांनी पिचलेल्या भामरागड तालुक्‍याला यंदा निसर्गाने केवळ भिजवूनच नव्हे, तर सहा-सात वेळा अक्षरश: पाण्यात बुडवून टाकले. वंचनेचे जीवन जगणाऱ्या या नागरिकांवर आभाळच कोसळले होते. पण, याच काळात त्यांच्या मदतीला प्रशासन वेगाने धावून आले. एकीकडे पोलिस जवान बचावकार्यात जिवाची बाजी लावत असताना पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेणे, अन्न, निवाऱ्याची सोय व इतर समस्या दूर करण्यात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारीही आपला जीव धोक्‍यात घालून कार्यरत होते. योग्य वेळी व वेगाने मिळालेल्या या मदतीमुळे अतिवृष्टीच्या प्रकोपाने भिजलेल्या लोकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. 

तशी पूरपरिस्थिती भामरागडवासींच्या पाचवीलाच पुजलेली आहे. "नेमेचि येतो मग पावसाळा' या उक्तीप्रमाणे येथील नद्या, नाल्यांना पूरही येत असतात. यंदाचा पूर वेगळा आणि अक्राळविक्राळ होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भीषण पूरपरिस्थितीमुळे सलग सहा दिवस भामरागडचा संपर्क तुटला होता. या दिवसांमध्ये वीजपुरवठा तसेच मोबाईल नेटवर्कही ठप्प होते.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये तब्बल सात वेळा पूर येऊन सात वेळा भामरागडचा संपर्क तुटला. एकीकडे भामरागडवासींचा जगाशी संपर्क तुटला असताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार कैलाश अंडील व जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे पूरग्रस्त जनतेशी संपर्क घट्ट करण्यात आपल्या सहकाऱ्यांसह गुंतले होते. 5 ते 10 तारखेदरम्यान भामरागडला 1994 च्या महापुरानंतर तेवढ्याच मोठ्या पूरपरिस्थितीशी सामना करावा लागला. पण, जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी भामरागडवासींना धीर दिला. आभाळ कोसळत असताना इकडे घरेही पाण्यात बुडाली होती आणि त्या स्थितीत तहसीलदार अंडील व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सोनवणे हे आपल्या चमूसह नावेतून धोकादायक प्रवास करीत नागरिकांना अन्न, पाणी पोहोचवत होते. त्यांचे सांत्वनेचे शब्द नागरिकांना संकटाशी झुंजण्याचे बळ देत राहिले. विशेष म्हणजे या कामात प्रशासनाचे सर्व विभाग खांद्याला खांदा लावून उभे होते. दिवसरात्र काम करून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेस मदतीचा हात दिला. भामरागड तालुका नक्षल चळवळीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील भाग मानला जातो. पोलिसांचे कामकाज मुख्यत्वे नक्षल चळवळीला आळा घालणे आणि बीमोड करणे हे आहे. मात्र, भामरागडमधील नागरिकांच्या संकटाचे गांभीर्य लक्षात येताच नक्षल्यांविरुद्ध शस्त्र धरणारे हे हात सेवेत गुंतले. "जिथे हिंसा तिथे शस्त्र, पण जिथे गरज तिथे सेवा' या दृष्टिकोनातून पोलिस पूरग्रस्तांच्या मदतीला धावले. येथे तैनात असलेले जिल्हा पोलिस, राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान मदतीसाठी दिवसरात्र कष्टत होते. 

पावसाचे प्रमाण लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण होणार याची कल्पना येताच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक सक्रिय झाले. तहसीलदार अंडील यांनी आदेश काढून सर्व शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांना पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी तैनात केले. या सर्व कर्मचाऱ्यांसोबतच पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज होते. त्यामुळेच येथे मनुष्यहानी झाली नाही. सकाळी सहाच्या आसपास आरेवाडा येथे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची खबर मिळताच रेस्क्‍यू बोट घेऊन पोलिसांची चमू तत्काळ आरेवाड्याला रवाना झाली. येथे त्यांना एक कुटुंब संपूर्ण घर पाण्यात बुडाल्यामुळे घराच्या छतावर बसलेले दिसून आले. या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड जोर होता. बिनाइंजिनची रेस्क्‍यू बोट असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात ती भरकटण्याची शक्‍यता होती. मात्र असे असतानाही पोलिसांनी प्राणाची बाजी लावत त्या कुटुंबास बाहेर काढले. भामरागड शहरातसुद्धा अशीच कठीण बचाव कार्ये करून लोकांना सुरक्षित स्थानी पोहोचण्यिात आले.

पुरादरम्यान नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेल्टर होमची व्यवस्था करण्यात आली होती. पुराच्या पाण्याची पातळी वेगाने वाढल्यामुळे शेकडो नागरिक सुरक्षित स्थानी पोहोचू शकले नव्हते. या लोकांसाठी प्रशासनातर्फे जेवणाची सोय करण्यात आली होती. हे जेवण तसेच पिण्याचे पाणी बोटीमधून जाऊन पूरग्रस्तांना देण्यात आले. दुसरे मोठे आव्हान पुरादरम्यान करावयाच्या बंदोबस्ताचे होते. दुकानांचे तसेच घरांचे नुकसान झाल्यामुळे व्यापारी बांधव तसेच नागरिक शहरातील एकमेव मुख्य रस्ता असलेल्या ठिकाणी गर्दी करीत होते. त्यामुळे बचावकार्य आणि मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. या लोकांना संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे होते. पोलिसांनी ही स्थिती हळूवार हाताळून अहोरात्र बंदोबस्त तसेच मदतकार्य सुरू ठेवले. घर, परिवार, वैयक्तिक दु:खे सारे काही विसरून पोलिस अहोरात्र नागरिकांच्या मदतीसाठी झटत होते. याच काळात एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग घडला. सात तारखेच्या पूरबंदोबस्तादरम्यान वायरलेसवरून अंकेश शिरसाठ या पोलिस कर्मचाऱ्याचे वडील मरण पावल्याचा संदेश मिळाला. वडिलांचे अंत्यदर्शन त्याला घेता यावे म्हणून प्रयत्न सुरू झाले. पुरामुळे सगळे रस्ते बंद असल्याने हेलिकॉप्टरने त्याला गडचिरोलीत पाठवणे हाच एकमेव पर्याय होता. मात्र, हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर भामरागड येथे पोचू शकत नव्हते. वडिलांच्या मरणाचे दु:ख बाजूला सारून हा पोलिस जवान बंदोबस्तात ताठ मानेने उभा राहिला. पूरग्रस्तांनाच आईवडील मानून त्यांची सेवा करत राहिला. वातावरण पूर्ववत झाल्यावर त्याला स्वगावी पाठविण्यात आले. पण, त्याला वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नाही. पूरग्रस्तांच्या मदतीत गुंतलेले पोलिस जवान, अधिकारी, कर्मचारी यांच्या अशा अनेक कहाण्या यादरम्यान घडल्या. त्यांच्यासाठी पूरग्रस्तांच्या एका डोळ्यात अश्रू, तर दुसऱ्या डोळ्यात कौतुक आहे.

पूरपरिस्थितीदरम्यान वीजपुरवठा तसेच बीएसएनएलची सेवा पूर्ववत करणे अतिशय गरजेचे होते. यासाठी या विभागातील कर्मचाऱ्यांना संपर्काकरिता सॅटेलाइट फोन आणि वायरलेस यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे हेमलकसा, आलापल्ली येथील वरिष्ठ कार्यालयाशी त्यांना संपर्क साधणे शक्‍य झाले. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास अडथळा निर्माण झाला होता. असंख्य अडचणी होत्या. अशा परिस्थितीत उपविभागीय अधिकारी डॉ. सोनवणे, तहसीलदार अंडील, बीएसएनएलचे विजय कुमार, पोलिस उपनिरीक्षक हुनमाने यांनी रात्री 10 ते पहाटे तीन वाजेपर्यंत वायरलेस आणि सॅटेलाइट फोनचा उपयोग करून ताडगाव येथील पोलिस मदत केंद्रामधून डिझेल तसेच संपर्कासाठी वायरलेस सेट हेमलकसा येथील बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना पोहोचवून भामरागड येथील मोबाईल नेटवर्क चालू होईल, याची व्यवस्था केली. पर्लकोटा नदीचे पाणी कमी झाल्यानंतर लगेच पोलिस, महसूल, आरोग्य, नगरपंचायत, इतर सर्व शासकीय विभाग, शाळेचे विद्यार्थी तसेच भामरागडचे नागरिक या सर्वांची तीन पथके तयार करून घेत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. त्यामुळेच पूर ओसरल्यानंतर एरवी पसरणारे साथीचे रोग रोखले गेले. पोलिस व प्रशासनातील मंडळींनी जिवाची बाजी लावून निकराने केलेल्या प्रयत्नांमुळेच एवढी आपत्ती येऊनही जीवितहानी झाली नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोठी या व इतर दुर्गम गावांना भेट देत तत्काळ आर्थिक मदत केली. पोलिस मदत केंद्राला पाठविलेल्या अन्नधान्याचा बराच भाग पूरग्रस्तांना पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांनीही दुर्गम गावांना भेटी दिल्या. त्यामुळेही पूरग्रस्तांना प्रशासन पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची प्रचिती आली. 

आता कुठे आहेत नक्षलवादी? 
जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागांतील नागरिकांचे कैवारी असल्याचे भासवत सशस्त्र क्रांतीचा नारा देत त्याच नागरिकांचे गळे कापणारे नक्षलवादी या काळात कुठेच दिसले नाहीत. सर्वहारा क्रांती, गरिबांना न्याय देण्याच्या वल्गना करत सरकार आणि पोलिसांविरोधात आदिवासी तरुणांची माथी भडकवणाऱ्या नक्षलवाद्यांना हे संकटग्रस्त नागरिक दिसले नाहीत का, असा प्रश्न विचारला जात आहे. या कसोटीच्या क्षणी पोलिस विभाग भामरागडच्या नागरिकांसाठी जिवाची बाजी लावत असताना याच नक्षल्यांनी पोलिसांना शरण आलेल्या आपल्याच बांधवांवर एटापल्लीत गोळीबार करून त्यांना ठार केले. तर ग्यारापत्तीच्या जंगलात पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. यात दोन नक्षलवादी ठार झाले. जनतेचा कैवार घेणाऱ्या या नक्षलवाद्यांना पुरात घरदार, सर्वस्व बुडालेल्या नागरिकांची अजिबात दया आली नाही. पण, एक गोष्ट चांगली घडली. या संकटसमयी जिल्हा व पोलिस प्रशासन धावून आल्याने अतिदुर्गम भागातील नागरिकांचे अनुबंध प्रशासनाशी अधिक घट्ट झाले आहेत. 

सुरू झाला मदतीचा ओघ... 
तहसीलदार तसेच एसडीपीओ कार्यालयामार्फत सर्वत्र मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मदतीचा ओघ भामरागड येथे मोठ्या प्रमाणात येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाने अनिकेत आमटे यांच्या नेतृत्वात सुरुवातीपासूनच मदतकार्य सुरू केले. अजूनही त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. गोंडवाना विद्यापीठाने मदतीचे साहित्य घेऊन वाहने पाठविली. राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मदतीच्या साहित्यासह वाहन पाठविले. याशिवाय इतर अनेक सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये उत्स्फूर्तपणे मदत करत आहेत. 

सर्वेक्षणाचे कार्य सुरू... 
नुकसानाची पाहणी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे 50 पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके संपूर्ण तालुक्‍यात जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. यातून झालेल्या नुकसानाची खरी परिस्थिती हळूहळू समोर येत आहे. पोलिस विभागातर्फेसुद्धा दुर्गम भागातील पोलिस मदत केंद्रांच्या माध्यमातून गावोगावी जाऊन पाहणी करण्यात येत आहे. तसेच सरकारी नुकसान भरपाईच्या योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे. शिवाय मदतीचे वाटपही करण्यात येत आहे. 

असा येतो पूर... 
भामरागडचे भौगोलिक स्थान हे येथे वारंवार येणाऱ्या पूरपरिस्थितीचे मुख्य कारण आहे. भामरागड येथे इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा या तीन नद्यांचा संगम आहे. या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रचंड ओघ घेऊन या नद्या वाहतात. इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. इंद्रावतीची पातळी वाढल्यामुळे पर्लकोटा नदीच्या पाण्याचा विसर्ग वेगाने होऊ शकत नाही. हीच स्थिती पामुलगौतम नदीची होते. त्यामुळे पर्लकोटा, पामुलगौतम या दोन नद्यांच्या पाण्यात फुगवटा तयार होऊन या नद्यांचे तसेच त्यांना येऊन मिळणाऱ्या नाल्यांचे पाणी संपूर्ण भामरागड तालुक्‍यात पसरते. 

""हे असं काही विपरीत घडू शकेल, याची पूर्वकल्पना आली होती. 8 आणि 9 ऑगस्टच्या पुराने ही बाब अधिक स्पष्ट झाली. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर, दंतेवाडा येथे तब्बल 288 मिमी पाऊस पडल्याने याचा तडाखा भामरागडला बसणार होता. मात्र, या परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी आम्ही आधीच केली होती. म्हणून 6, 7, 8 ऑगस्टला रेड अलर्ट जारी केला. 6 व 7 तारखेला शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार कैलाश अंडील व इतर विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिशय सक्षमतेने परिस्थिती हाताळली. आता मदतकार्य वेगाने सुरू आहे. '' 
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, गडचिरोली 

""या भयंकर पूरपरिस्थितीत अनेक आव्हाने निर्माण झाली होती. पण, आमचे पोलिस जवान व जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत सर्व आव्हानांना तोंड देत नागरिकांना मदत केली. आमचे मदतकार्य सुरूच आहे. आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक संकटग्रस्त नागरिकांच्या सोबत आहोत. नक्षल्यांसाठी शस्त्र घेऊन आणि नागरिकांसाठी सेवेचे हृदय घेऊन आम्ही सज्ज आहोत.'' 
- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली 

""तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणारी मदत ही गृहोपयोगी वस्तूंच्या स्वरूपात करण्यात येत असली तरी गरिबीने पिचलेल्या आणि प्रशासनाशी अजूनही पूर्णपणे एकरूप न झालेल्या या आदिवासी बांधवांसाठी ही मदत निश्‍चितच दिलासादायक आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो की, त्यांनी अधिकाधिक मदत भामरागड येथे पाठवावी, जेणेकरून या आदिवासी बांधवांना प्रशासनाशी एकरूप करण्यामध्ये अजून एक मोलाचे पाऊल उचलले जाऊ शकेल.'' 
- डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, भामरागड 

""पूरपरिस्थिती गंभीर होण्याची लक्षणे दिसताच आम्ही पथक तयार करून लोकांना सावध करत सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन मराठी व माडिया भाषेत केले. पण, काही नागरिकांना त्यांची घरे बुडतील, असे वाटत नव्हते. बराच खटाटोप करून त्यांना समजवावे लागले. पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्न, पाणी बोटीद्वारे पोहोचविले. हे मदतकार्य चोवीस तास करावे लागणार, याचा अंदाज आल्याने आम्ही पथके तयार करून प्रत्येकाची आठ-आठ तासांची पाळी लावली. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र नागरिकांची सेवा करू शकले. '' 
- कैलाश अंडील, तहसीलदार, भामरागड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com