esakal | खासगी शाळांचे प्रवेश अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आतातरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी जागे होऊन बंद असलेल्या शाळांचे दरवाजे उघडून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले, गुणपत्रिका देऊन पुढील शिक्षणासाठी मोकळे करावे. परिणामी त्यांचे प्रवेश निश्‍चित होतील व खासगी शाळांचेसुद्धा प्रवेश होऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरिता व्यवस्था करण्याची मुभा मिळेल.

खासगी शाळांचे प्रवेश अडचणीत

sakal_logo
By
प्रतीक मालवीय

धारणी(अमरावती) ः मेळघाटच्या धारणी तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळा कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाने बंद केल्याने शाळेला कुलूप आहे. त्यामुळे पालकांना शाळा सोडल्याचे दाखले मिळत नाहीत. परिणामी इतर शाळेत प्रवेश घेणे त्यांना अडचणीचे जात आहे. याचा फटका खासगी माध्यमिक शाळांतील पटसंख्येला बसला असून शिक्षण विभागाने तत्काळ जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना शाळा सोडल्याचे दाखले वितरित करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. 
धारणी तालुक्‍यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मागील तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहेत. शालेय पोषण आहार वाटप याव्यतिरिक्त एकही दिवस शाळा उघडल्या गेली नाही. परिणामी वर्ग चौथी,  सातवी तसेच आठवी उत्तीर्ण झालेल्या मुलांना शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका न दिल्यामुळे पुढील वर्गातील प्रवेश अडचणीत आले आहे. याचा परिणाम खासगी माध्यमिक शाळांतील वर्ग पाच, आठ व नववीच्या पटसंख्येवर झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पालकांना त्वरित शाळा सोडल्याचे दाखले व गुणपत्रिका वितरित करून पुढील वर्ग प्रवेशाचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी धारणी तालुका मुख्याध्यापक संघ माध्यमिक विभाग यांनी केली आहे. 

बापरे! पाच दिवसांत १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात कोरोना ठरतोय कर्दनकाळ


पाचवी आणि आठवीमध्ये बोटावर मोजण्याइतपत प्रवेश झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मेळघाटात शिक्षण जवळपास ठप्प झाले असून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून कोसो दूर आहेत. तांदळाव्यतिरिक्त त्यांना काहीच मिळत नाही. डिजिटल शिक्षणाचा लवलेश नाही. मोबाईल, डिजिटल क्‍लास, ऑनलाइन तास, याचा कुठेच पत्ता नाही आणि ते त्यांच्या आवाक्‍यातसुद्धा नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला जरी शिक्षण सुरू असल्याचे दिसत असले तरी मेळघाटात मात्र शिक्षणाचे तीनतेरा वाजत आहे. आतातरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी जागे होऊन बंद असलेल्या शाळांचे दरवाजे उघडून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले, गुणपत्रिका देऊन पुढील शिक्षणासाठी मोकळे करावे. परिणामी त्यांचे प्रवेश निश्‍चित होतील व खासगी शाळांचेसुद्धा प्रवेश होऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरिता व्यवस्था करण्याची मुभा मिळेल.

जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांनी मुलांना शाळा सोडल्याचे दाखले, गुणपत्रिका न दिल्याने खासगी माध्यमिक शाळांतील प्रवेश थांबलेले आहेत. अनेक शाळांनी विद्यार्थी प्रमोट केलेले नाहीत. स्टुडंट पोर्टल अपडेट नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे कोणतेच काम पोर्टलवर करता येत नाही. दाखले न दिल्याने खासगी माध्यमिक शाळांमधील प्रवेश नाममात्र झाले आहेत. याकरिता तत्काळ दाखले व विद्यार्थी पोर्टल अपडेट करण्याचे आदेश शिक्षण विभागाने द्यावे. 
- संजय लायदे, मुख्याध्यापक.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन