'प्लान बी'सुद्धा तयार ठेवा; या नवनियुक्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला कानमंत्र 

शशिकांत जामगडे
शनिवार, 20 जून 2020

पुन्हा जोमाने तयारी करून अखेर उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. हे स्वप्न पूर्ण होऊनही कु. स्नेहल समाधानी नसून यूपीएससीची परीक्षा देऊन भारतीय प्रशासन सेवेतील पद प्राप्त करण्याचे स्वप्न बाळगुण आहेत. लहान बहिणींना मार्गदर्शन करीत असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करवून घेत आहेत. 

श्रीरामपूर (यवतमाळ) : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एकच मार्ग न अनुसरता यशप्राप्तीसाठी "प्लान बी' ही तयार ठेवल्यास नैराश्‍य येणार नाही, असे मत नुकत्याच उपजिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या स्नेहल रहाटे यांनी "सकाळ'शी संवाद साधताना व्यक्त केले. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये घेण्यात आल्या होत्या. परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 19) लागला. त्यामध्ये उमरखेडमधील स्नेहल दीपक रहाटे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या यशाचे रहस्य सांगितले. त्यांचे वडील सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी तर आई जि. प. शाळेत मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहेत. स्नेहल यांना सोनल व मीनल या दोन बहिणी आहेत. 

लहानपणापासूनच त्यांच्या आईने त्यांना "तू मुलगी आहेस' ही जाणीव होऊ न देता मोकळीक देऊन आयुष्यात यशस्वी होण्याचे धडे दिले. स्नेहल यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उमरखेडमधील संत गोरोबा विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात झाले. यानंतर चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल या शाखेतून 2015मध्ये पदवी प्राप्त केली. परंतु, राजपत्रित अधिकारी होण्याची त्यांची आंतरिक इच्छा पूर्ण होण्याकरिता त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेसाठी पुणे येथील नामांकित असलेल्या "युनिक ऍकेडमित' प्रवेश घेऊन केवळ एक वर्ष तयारी केली. तर, उमरखेड येथे असताना सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत स्वअध्ययन केले. 2017 मध्ये दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पहिल्या परीक्षेत यशस्वी होऊन त्यांची विक्रीकर निरीक्षक, मंत्रालयात सहायक कक्षाधिकारी व नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या तीन पदांसाठी निवड झाली. परंतु, समांतर आरक्षणासंदर्भात चालू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे नियुक्तीला विलंब झाला. 

हेही वाचा : प्रेमविवाहाचा करुण अंत; गर्भपात झाल्याने विवाहितेने केले असे... 

दरम्यान, त्यांनी 2018 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुन्हा परीक्षा दिली. परीक्षेत यश मिळून उपजिल्हाधिकारी होण्याची मनीषा बाळगत असताना मौखिक परीक्षेत अवघ्या काही गुणांनी पाहिलेल्या स्वप्नाला हुलकावणी दिली. 2017मधील परीक्षेचा न्यायालयीन निकाल ऑक्‍टोबर 2019मध्ये लागल्यानंतर त्यांची बार्शीटाकळी (जि. अकोला) येथील नगर परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर 1 फेब्रुवारी 2020 ला नियुक्ती झाली. याहीपेक्षा मोठे पद मिळविण्यासाठी त्यांनी नोकरी सांभाळून अभ्यासात कमी न पडता पुन्हा जोमाने तयारी करून अखेर उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. हे स्वप्न पूर्ण होऊनही कु. स्नेहल समाधानी नसून यूपीएससीची परीक्षा देऊन भारतीय प्रशासन सेवेतील पद प्राप्त करण्याचे स्वप्न बाळगुण आहेत. लहान बहिणींना मार्गदर्शन करीत असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करवून घेत आहेत. 

 

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे ग्लॅमर म्हणून न बघता आपले ध्येय निश्‍चित करून मार्गक्रमण करावे. अपयश आल्यास नैराश्‍य न येण्यासाठी 'प्लान बी' म्हणजेच दुसरा मार्ग तयार ठेवून आयुष्यात स्थैर्य मिळवा. केवळ शहरी भागातील विद्यार्थी किंवा नामांकित ऍकेडमीचे वर्ग लावल्यानेच परीक्षेत यश मिळते हा गैरसमज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काढून टाकावा. कारण, जिद्द, चिकाटी, मेहनत व कठोर परिश्रमाने कुठेही राहून यश प्राप्त करता. 
-स्नेहल रहाटे, उपजिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advice given by the newly appointed Deputy Collector