महावितरणाविरोधात बेमुदत चक्‍काजाम सुरू...अनेक तास खोळंबली वाहतूक

नंदकिशोर वैरागडे 
Wednesday, 5 August 2020

सर्वपक्षीय तालुकाविकास आंदोलन समितीच्या वतीने तालुक्‍यातील नागरिकांसह कोरची-कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी म्हटले आहे की, कुरखेडा-कोरची येणारी वीजवाहिनी घनदाट जंगलातून येत असल्याने नेहमी ब्रेकडाउन अटेंड करण्यासाठी अडचणी निर्माण होतात.

कोरची : महावितरणाचे ढिसाळ नियोजन व मनमानी कारभारामुळे सतत खंडित होणारा वीजपुरवठा, तब्बल 18 तासांचे भारनियमन आदी समस्यांनी त्रस्त नागरिकांनी मंगळवारी महावितरणविरोधात सकाळपासून चक्‍काजाम आंदोलन आरंभ केले होते. त्यामुळे येथील मार्गावरची वाहतूक अनेक तास खोळंबली होती. 

सर्वपक्षीय तालुकाविकास आंदोलन समितीच्या वतीने तालुक्‍यातील नागरिकांसह कोरची-कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी म्हटले आहे की, कुरखेडा-कोरची येणारी वीजवाहिनी घनदाट जंगलातून येत असल्याने नेहमी ब्रेकडाउन अटेंड करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही वीज वाहिनी रस्त्याच्या कडेला शिफ्ट करण्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, कुरखेडा-कोरची वीजवाहिनी रस्त्याच्या कडेला शिफ्ट करेपर्यंत देवरीवरून नियमित वीजपुरवठा कोरचीला देण्यात यावा.

कोरची हे तालुक्‍याचे मुख्यालय असून तालुक्‍यात 133 गावे आहेत. कोरचीला वीजपुरवठा देवरी व कुरखेड्यावरून केला जातो. याकरिता 33 केव्ही उपकेंद्राला 20-22 कमी दाबाचा वीजपुरवठा करण्यात येतो. परिणामी कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची नेहमीच समस्या निर्माण होते. त्यामुळे कोरची येथे 132 केव्ही वीज उपकेंद्राची निर्मिती करावी, कोरची तालुक्‍यातील कोटगूल परिसरात 2012 मध्ये ढोलडोंगरी येथे 33 केव्ही उपकेंद्र सुरू करण्याची परवानगी मिळाली होती.

तथापि निधी अभावी उपकेंद्राची निर्मिती अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या उपकेंद्राच्या निर्मितीसाठी निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा. कोरची तालुक्‍यात बीएसएनएलशिवाय अन्य कोणत्याही कंपनीची दूरसंचार सेवा उपलब्ध नाही. भारतात 4 जी सेवा उपलब्ध आहे. मात्र कोरची तालुक्‍यात 2जी सेवाही नियमीत देण्यात येत नाही. परिणामी डिजिटल इंडिया, ऑनलाइन शिक्षण या संकल्पनाच स्वप्नवत झाल्या आहेत. त्यामुळे बीएसएनएलने तालुक्‍यात अधिक मनोरे उभारून दूरसंचार सेवा अधिक बळकट करावी.

खरीप हंगाम 2020 च्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची शेतात धानाची पेरणी केली. त्यानंतर पावसाने गेल्या दीड महिन्यापासून दांडी मारल्याने उगवलेली धानाची रोपे करपून गेली आहेत. त्यामुळे कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात यावे. मोफत बी-बियाण व खताचा पुरवठा करावा. राष्ट्रीयीकृत बॅंकेची शाखा उघडावी व लॉकडाउनच्या काळातील तालुक्‍याच्या जनतेचे वीजबिल माफ करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन प्रारंभ करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांशीच चर्चा करणार...

सध्या आंदोलक संतप्त असून त्यांनी मार्ग रोखून धरला. आपण फक्त जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशीच चर्चा करू. ते आंदोलनस्थळी येऊन चर्चेस तयार असले, तरच आंदोलन मागे घेण्याचा विचार करण्यात येईल, असे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे वृत्त लिहिपर्यंत हे चक्‍काजाम आंदोलन सुरूच होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The agitation against MSEDCL at Korchi caused a traffic jam