
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवार (ता. २९) आपल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान उत्तर गडचिरोलीच्या टोकावरील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असलेल्या धानोरा उपविभागाअंतर्गत अतिदुर्गम कटेझरी पोलिस मदत केंद्रात पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आयोजित जनजागरण मेळाव्यास उपस्थिती दर्शवली. उपमुख्यमंत्री पवार व गृहमंत्री पाटील यांच्या कटेझरी पोलिस मदत केंद्रातील नवीन इमारतीचा शिलान्यास सोहळा पार पाडला. यावेळी पोलिस दादालोरा खिडकी, सुरक्षा गार्ड (मोर्चा), पोलिस अधिकारी व अंमलदारांचे बॅरेक, अंमलदारांचे खासगी घर आदींना भेट देऊन पोलिस मदत केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली.
तसेच मेळाव्यात उपस्थित गरीब गरजू नागरिकांना तीनचाकी सायकल, लेडीज सायकल, शिलाई मशिन, फवारणी पंप, डिश टीव्ही, साऊंड सिस्टिम, शामियाना, सोलर पंप, सिन्टेक्स झेरॉक्स मशिन, प्लास्टिक खुर्ची, कपडे, खोदकामासाठी लागणारे साहित्य, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी तसेच शालेय मुलांना उपयोगी वस्तू व इतर भेटवस्तू दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून येथील सामान्य जनतेस मुख्य प्रवाहात आणून सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासित केले. तसेच जनतेने नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे सांगितले. यावेळी कटेझरी परिसरातील ५०० ते ६०० नागरिक मेळाव्यास उपस्थित होते.
त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार व गृहमंत्री पाटील यांनी गडचिरोली पोलिस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे भेट देऊन नक्षलविरोधी अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी सी-६० पथकाचा कमांडो भत्ता दुप्पट करून दिल्याबद्दल सी-६० पथकाच्या प्रमुखांनी उपमुख्यमंत्री पवार यांचा सत्कार करून आभार मानले. याप्रसंगी पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे उपस्थित होते.
सरकार पोलिसांच्या पाठीशी...
या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलिस दलाच्या मागील कामगिरीचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र शासन गडचिरोली पोलिस दलाच्या नेहमी पाठीशी असल्याचे सांगितले.