संमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे "गोंदण'

नितीन नायगांवकर
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

संमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे "गोंदण'
नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले "गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी जनजीवनाची परंपरा ध्यानात ठेवून यजमान संस्थेने ही संकल्पना निवडली आहे. कोलाम, आंध, बंजारा, गोंड आदी जमातींच्या साहित्य-संस्कृतीवर प्रकाश टाकणारे लेखही स्मरणिकेत समाविष्ट करण्यात येत आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11 ते 13 जानेवारी या कालावधीत यवतमाळ येथे होणार आहे. साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक व शेतकरी चळवळींची एक मोठी परंपरा या जिल्ह्याला लाभली असून त्याचे प्रतिबिंब संमेलनाच्या स्मरणिकेत उमटणार आहे. आदिवासी लोक सुई किंवा काट्याच्या साहाय्याने शरीरावर एखादे चित्र किंवा चिन्ह गोंदवून घेतात. या क्रियेलाच गोंदण असे म्हणतात. यवतमाळच्या सांस्कृतिक वाटचालीत आदिवासींचे मोठे योगदान आहे, त्याची नोंद स्मरणिकेतून घेण्यात येत आहे. मराठी साहित्यातील संशोधन, संत साहित्य, वैचारिक, दलित, आदिवासी साहित्याचा ऊहापोह करणारे लेख यात असणार आहेत. याशिवाय सद्यःस्थितीत मराठी साहित्यात स्त्रियांचे लेखन, ग्रामीण साहित्याची वाटचाल, वऱ्हाडी बोली व साहित्य यांचाही समावेश असणार आहे. जवळपास अडीचशे पानांच्या या स्मरणिकेचे संपादन डॉ. अशोक मेनकुदळे करणार आहेत. इतर धर्मीय साहित्यिकांचे मराठीतील योगदान अधोरेखित करणारे लेखही यामध्ये असणार आहेत. यात मुस्लिम मराठी साहित्य, लिंगायत मराठी साहित्य, महानुभाव साहित्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे विदर्भाच्या संस्कृतीचा भाग असलेल्या नद्यांचे सविस्तर चित्रण "सातपुड्याची कूस' या लेखाच्या माध्यमातून होणार आहे. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या साहित्यिक वाटचालीवरही एक लेख स्मरणिकेत असणार आहे. या स्मरणिकेचे आकर्षक मुखपृष्ठ तयार करण्याची जबाबदारी चित्रकार बळी खैरे यांच्यावर आहे.

गालिबचे काव्य...
"गोंदण'मध्ये मराठीसह इतर भारतीय भाषांमधील साहित्यावरील लेखही असणार आहेत. यात विशेषत्वाने गालिबचे काव्य, अमृता प्रीतम यांचे साहित्य, गिरीश कर्नाड यांची नाटके, टागोरांचे साहित्य आदींसह नोबेल साहित्यिकांवर चर्चा घडविणारा लेखही असेल.

शेतकरी चळवळ, शेती आणि शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आदींची चर्चा ग्रामीण साहित्याची वाटचाल मांडताना लेखक करणार आहेत.
- डॉ. अशोक मेनकुदळे, संपादक, संमेलन स्मरणिका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akhil bhartiy marati sahitya sammelan news