अकोल्याच्या या खेळाडूने केली द्विशतकी खेळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aryan

विजय तेलंग क्रिकेट स्पर्धेत मर्यादित षटकाच्या सामन्यात आर्यनची धडाकेबाज खेळी

अकोल्याच्या या खेळाडूने केली द्विशतकी खेळी

अकोला :  देशातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अकोल्यातील क्रिकेटपटू त्यांच्या खेळाने प्रभावित करीत असतानाच आणखी एका खेळाडूने स्थानिक पातळीवर द्विशतकी खेळी करीत अकोल्यात गुणवत्तेला कमी नसल्याचे दाखवून दिले. विजय तेलंग आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात अकोल्याच्या आर्यन मेश्रामच्या 200 धावांच्या बळावर भंडारा संघावर 199 धावांनी विजय नोंदविला.

अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळल्या केलेल्या 50 षटकांच्या या सामन्यात अकोला संघाने प्रथम फलंदाजी करताना 336 धावांचा डोंगर उभा केला. त्यात समालीवीर आर्यनच्या एकटयाच्याच 200 धावांचा समावेश आहे. त्याने 141 चेंडूंचा सामना करीत 27 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने त्याने ही द्विशतकी खेळी उभारली. त्याच्या एकूण 200 धावांमध्ये चौकार आणि षटकारांचा वाटा 162 धावांचा होता. यावरून त्याच्या एकूणच बहारदार खेळाचा प्रत्यय येतो. त्याला या खेळीदरम्यान अहान जोशीने 29 तर सिद्धांत मुळेने नाबाद 54 धावा काढून सुरेख साथ दिली. भंडारा संघातर्फे शुभम रोडेने 3 तर गोविंद मेहता आणि उपदेश राजपुत यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात भंडारा संघ 47.7 षटकात 217 धावा काढून बाद झाला. त्यामुळे त्यांना 119 धावांनी पराभव पत्करावा लागला. अकोला संघातर्फे सिद्धांत मुळे अर्ध शतकी खेळीनंतर 21 धावांमध्ये 3 गडी बाद करून अष्टपैलू खेळ केला.

कोण आहे आर्यन?
स्थानिक क्रिकेट स्पर्धेत मर्यादित षटकाच्या सामन्यात 200 धावा काढणारा आर्यन मेश्राम आहे तरी कोण, असा प्रश्न सर्व क्रिकेट रसिकांना पडला असेल. हा अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू असून, अतिशय होतकरू क्रिकेटपटू आहे. त्याने यापूर्वी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. आजच्या खेळीने त्याने विदर्भ संघाचे द्वार ठोठावले आहे. 

यापूर्वीही अकोल्यातून उदयास आले अनेक क्रिकेटपटू
विदर्भ संघाकडून रणजी करंडक स्पर्धा खेळत असलेला वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरे, २३ वर्षांखालील युवा विदर्भ संघाकडून खेळणार अथर्व तायडेसह विदर्भाच्या सर्वच स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत अकोल्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करीत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता आर्यननेही विदर्भ संघाच्या निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.

loading image
go to top