Akola : दिवाळीत भेसळयुक्त मिठाईचा धोका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Akola : दिवाळीत भेसळयुक्त मिठाईचा धोका

अकोला : दिवाळीच्या सनात मिठाईला विशेष महत्त्व आहे. पूर्वी घरी केलेली मिठाई दिवाळीत उपयोगात आणली जात होती. मात्र, बदलत्या काळासोबत दिवाळीतील फराळही आता ‘रेडिमेट’ घेतला जातो. त्यामुळे दिवाळीत मिठाईला मोठी मागणी असते. हीच बाब लक्षात घेवून मिठाईमध्ये भेसळ करण्याचे प्रकार सुरू झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (ता. १४) अकोला शहरात केलेल्या दोन कारवाईत ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी दिवाळीत मिठाई खरेदी करताना सावध राहणे आवश्यक आहे. भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने दोन ठिकाणी कारवाई करीत एकूण४८६ किलो मिठाई जप्त केली.

शक्रवारी सकाळी ८ वाजता अकोला निमवाडी परिसरात असलेल्या खासगी बसच्या लक्झरी स्थानकावर अनिकेत प्रफुलकुमार सेठ (रा.कामरगाव जि. वाशीम) यांच्या ताब्यातून इंडियन स्वीट विकास बँड ही मिठाई जप्त करण्यात आली. तपासणीसाठी नमुना ताब्यात घेण्यात आला असून, उर्वरित साठा २९८ किलो (किंमत ५९ हजार ६००) जप्त करण्यात आली. अन्नपदार्थाच्या पॅकेटवर लॉट नंबर, उत्पादन तिथी व व्हेज सिम्बॉल नमूद नसल्याने हा साठा जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई सकाळी ११.३० वाजता हरिहर पेठ अकोला येथील शुभम रामसरन पांडे यांच्या मालकीचे सौम्य गृह उद्योग या पेढीतून करण्यात आली. येथे स्पेशल बर्फी श्रीकृष्ण ब्रँड या अन्न पदार्थाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. उर्वरित साठा १८८ किलो (किंमत ४७ हजार) जप्त करण्यात आला. अन्नपदार्थाच्या पॅकेटवर लॉट नंबर, उत्पादन तिथी व व्हेज सिम्बॉल नमूद नसल्याने सदर साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे, नमुना सहायक पांडे यांनी सह आयुक्त, अमरावती श्री कोलते व सहाय्यक आयुक्त, अकोला श्री तेरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

नियमित तपासणी व्हावी!

सध्या बाजारात भेसळयुक्त मिठाईचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: दुधापासून बनलेल्या खव्याची मिठाई सर्वोत्तम असते. मात्र, खव्याचे प्रमाण कमी करून त्यात अन्य प्रकारचे पीठ व रासायनिक पदार्थ वापरून भेसळयुक्त मिठाई बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहे. बनावट खवा बनवणारे परप्रांतीय असल्याचे सांगितले जाते. मिठाई दुकानदार त्यांच्याकडून खवा विकत घेऊन मिठाई तयार करतात. अन्न व औषध प्रशासन विभागाकडूनही उघड्यावरील अन्नाचे नमुने तपासले जात नाहीत. भेसळयुक्त मिठाईची तपासणी करून कारवाई करण्याबाबत हा विभाग उदासीन आहे. त्यामुळे बनावट खवा, मिठाई दुकानदारांचे फावते. सध्या शहरातील अनेक हॉटेलमध्ये असा भेसळीचा गोरखधंदा सुरू आहे. याची अन्न व औषध प्रशासन विभागाने दखल घ्यावी, असे आवाहन ग्राहकांकडून होत आहे.