Video: अन् घराच्या टेरिसवरच उभारले हॉकीचे मैदान, दोनशे खेळाडू करतायेत लॉकडाउनमध्ये सराव

भगवान वानखेडे 
बुधवार, 20 मे 2020

22 मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि 24 मार्चपासून देशभर लाॅकडाउन जाहीर करण्यात आला. सध्या दोन महिने झाले सर्वजण घरातच आहेत. यामध्ये खेळाडूंचाही समावेश आहे. या खेळाडूंच्या दिनचर्येवर या लॉकडाउनचा विपरीत परिणाम झाला असला तरी इच्छा तिथे मार्ग या म्हणीला अकोला हॉकी असोसिएशनने सार्थ करून दाखविले आहे

अकोला  ः राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्या जादुई खेळाने यशाचे शिखर पदक्रांत करणाऱ्या अकोला हॉकीअसोसिएशनचे दोनशेहून अधिक खेळाडू सध्या टाळेबंदीमध्ये घराच्या टेरीसवरच हॉकीचा सराव करीत आहेत. विशेष म्हणजे या लाॅकडाउन काळात हॉकीचे बेसिक स्कील शिकण्यास मदत होत असल्याने हॉकीपटूंसाठी हा लॉकडाउन फायदेशीर ठरला असल्याचे बोलले जात आहे.

 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि 24 मार्चपासून देशभर लाॅकडाउन जाहीर करण्यात आला. सध्या दोन महिने झाले सर्वजण घरातच आहेत. यामध्ये खेळाडूंचाही समावेश आहे. या खेळाडूंच्या दिनचर्येवर या लॉकडाउनचा विपरीत परिणाम झाला असला तरी इच्छा तिथे मार्ग या म्हणीला अकोला हॉकी असोसिएशनने सार्थ करून दाखविले आहे. लॉकडाउन काळात मैदानावर जाता न येत असल्याने या खेळाडूंनी घराच्या छतावरच हाॅकीचे मैदान उभारले असून, वेळेनुसार, हे खेळाडू छतावरच हॉकीचे बेसिक स्कील शिकत आहेत.

प्रशिक्षक देतायेत व्हिडीओ कॉलिंगवर कानमंत्र
अकोला हॉकी असोसिएशनचे तब्बल 200 ते 250 खेळाडू सध्या टाळेबंदीत अडकले आहेत. या  खेळाडूंनी जमेल त्या ठिकाणी मैदान उभारून सराव सुरू केला आहे. या खेळाडूंना हॉकीअकोला असोसिएशनचे प्रशिक्षक मयुर निंबाळकर, मयुर चौधरी, शाहरुख खान हे प्रशिक्षक खेळाडूंना व्हिडीओ कॉल करून कानमंत्र देत आहेत.

राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी
अकोला हॉकी असोसिएशनच्या खेळाडूंनी आतापर्यंत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ज्या प्रमाणात हे खेळाडू सध्या सराव करीत आहेत. त्या प्रमाणात येणाऱ्या काळात या खेळाडूंकडू मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.

सध्या टाळेबंदी असल्याने खेळाडू अडकून पडले होते. मात्र, काहींनी कल्पना सुचविली आणि त्यानुसार करण्याचे ठरले. आज सर्व खेळाडू शक्य त्या ठिकाणी सराव करीत आहेत. प्रशिक्षकही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत आहे.
-धीरज पृथ्वीराज चव्हाण, सचिव, अकोला हॉकी असोसिएशन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola hockey field is set up on the terrace of the house, with 200 players practicing in the lockdown