esakal | लॉकडाऊनः अक्षय्य तृतीयेला सराफा व्यवसायाला कोट्यवधींचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Lockdown Akshayya Tritiya hits billions in business

टाळेबंदीमुळे दुकाने बंद असल्याचा फटका सराफा आणि इतर व्यावसायिकांना देखील  बसणार आहे. दरवर्षी या दिवशी सोने खरेदीतून मोठी उलाढाल होते. मात्र यंदा या व्यवसायाला कोट्यावधींचा फटका बसला आहे.

लॉकडाऊनः अक्षय्य तृतीयेला सराफा व्यवसायाला कोट्यवधींचा फटका

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोलाः साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेवर यंदा कोरोनाचे सावट आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र टाळेबंदीमुळे दुकाने बंद असल्याचा फटका सराफा आणि इतर व्यावसायिकांना देखील  बसणार आहे. दरवर्षी या दिवशी सोने खरेदीतून मोठी उलाढाल होते. मात्र यंदा या व्यवसायाला कोट्यावधींचा फटका बसला आहे.

अक्षय्य तृतीयेला हिंदू दिनदर्शिकेत विशेष महत्व आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. विष्णू पार्वतीचे स्वामित्व असलेली ही तिथी आहे. यंदा रविवारी (ता.26) हा योग जुळून आला आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला गेल्याने या दिवशी एखाद्या नवीन कामाला प्रारंभ किंवा नवीन वस्तूंची  खरेदी करण्याची प्रथा वषार्नुवर्षे चालत आली आहे. या दिवशी जे शुभ कार्य केले जाते. त्याचे फळ अक्षय मिळते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होणार नाही. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास ते वृद्धिंगत होत जाते असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी प्रामुख्याने काही ग्रॅमपासून ते तोळ्यापर्यंत सोने खरेदी करण्यावर भर दिला जातो. मात्र यंदाच्या अक्षय तृतीयेवर कोरोनाचे संकट ओढावले आहे. एरवी या दिवशी गजबजणारा गांधी मार्ग, सराफा बाजार, टिळक रोड अशा सर्वच भागांमध्ये नीरव शांतता असणार आहे. कोरोनामुळे पुढचे चित्र ही स्पष्ट नाही अन् दुकानेही बंद असल्याने सराफा बाजाराला कोट्यावधींचा फटका बसला आहे. मुंबई, पुणे,नागपूर, औरंगाबाद, जळगाव सारख्या मोठ्या शहरांप्रमाणे अकोला शहरासह बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सराफा बाजारालाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे.

सोने 46 हजारावर
सराफा बाजारातील सोन्याचे लॉकडाऊनपूर्वी 42 हजारापर्यंतचे दर आता 46 हजारावर पोहचले आहेत. मात्र असे असले तरी ग्राहकांसाठी यावर्षीच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करता येणार नाही. 

ऑनलाईन खरेदीकडे पाठ
शहरातील ग्राहकांची सोने, चांदी खरेदीची मानसिकता पाहता सामान्य दुकानांनी ऑनलाईन विक्रीस पुढाकार घेतला नाही. मात्र, काही सराफा व्यावसायिकांनी ऑनलाईन विक्रीस पुढाकार घेतला आहे. फोनद्वारे बुकींग करून होम डिलिव्हरीची सुविधा दिली असली तरी त्यालाही अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे.

घरीच करा गोडधोड
मिठाईची दुकाने देखील बंद असल्याने यंदाचा हा सण घरातीलच गोडधोड पदार्थ करून सर्वजण साजरा करणार आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग मुळे एकमेकांना भेटता येणे शक्य नसल्याने सोशल मीडियावरच शुभेच्छा देऊन हा सण ‘गोड’ मानावा लागणार आहे.

यंदाच्या अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट आहे हे खरं आहे.  दुकाने बंद असल्याने सोने खरेदीवर परिणाम होणार आहे.तरीही आम्ही शासनाच्या सूचनांचे पालन करणार आहोत.  या दिवशी सोने खरेदीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदा सराफा बाजार कोरोनाच्या लढ्याला समर्थन देत हे नुकसान सहन करणार आहे.
प्रा.डॉ.संतोष हुशे, हुशे बंधु ज्वेलर्स गोल्ड ॲन्ड जेम्स, अकोला.

लॉकडाऊनमुळे शहरातील जवळपास 100 सराफा दुकाने बंद आहेत. तर एकूण जिल्ह्यातील 400 हून अधिक दुकाने बंद आहेत. विवाह मूहूर्त असूनही लॉकडाऊनमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात होणारी सोने खरेदी थांबलेली आहे. त्यासोबतच सोने तारणाचा मोठ्या व्यवसायालाही फटका बसला आहे. 
- प्रकाश लोहीया, ईशा ज्वेलर्स, अकोला