आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे

शुभम बायस्कार
Friday, 3 April 2020

कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अहोरात्र परीश्रम घेतले जात आहे. अशातच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी दिली. 

 

अकोला : कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अहोरात्र परीश्रम घेतले जात आहे. अशातच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी दिली. 

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रासाठी एम.डी., एम.एस., डिप्लोमा, एम.एस्सी कोर्स आदी अभ्यासक्रामांची परीक्षा या १२  मे २०२० पासून पुढे सुरु करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पदव्युतर पदवीच्या विद्यार्थ्यांची रुग्णसेवेसाठी मदत घेतली जात असल्याने मार्डचे अध्यक्ष डॉ. राहूल वाघ व इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना व विद्यापीठाला यासंदर्भात निवेदन दिले होते. 

हेही वाचा :सीबीएसई’च्या पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द

याबाबत डी.एन.बी. व इतर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया तसेच सद्य परिस्थिती  लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचनांप्रमाणे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानूसार  मे -२०२० उन्हाळी सत्रातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा पेपर-१ हा १५ जून २०२०, पेपर-२ हा १७ जून, पेपर-३  हा १९ जून आणि पेपर-४ हा २२ जून रोजी सकाळी ११  ते दु.  २ या वेळेत निश्चित करुन देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. 

तसेच सत्र-२ च्या उन्हाळी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज विद्यापीठात विना विलंब शुल्कासहीत सादर करणेसाठी ५ मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी ८ मे २०२० आणि अति विलंब शुल्कासहीत  १२  मे २०२० पर्यंत विद्यापीठाकडून मुदतवाढ देण्यात आल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सप्निन तोरणे यांनी कळविले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola-Medical Exam postponed