आपलीच गाडी, आपलीच वीज !

शुभम बायस्कार 
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

मूर्तिजापूर, अकाेला स्थानकावर रेल्वेचा सौरऊर्जा प्रकल्प ः केंद्रीय अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध होणार

अकोला :  रेल्वेत विजेची बचत करण्यासाठी भुसावळ विभागातील तीन रेल्वे स्थानकांजवळ लवकरच सौर उर्जानिर्मिती प्रकल्प सुरू होणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकाेला या स्थानकांची या प्रकल्पांसाठी निवड करण्यात आली आहे. 

पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्वावर हे प्रकल्प आधारीत असतील. केंद्रीय अर्थसंकल्पातून सौर उर्जा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. एकंदरीतच आपलीच विज आपलीच रेल्वे हे धोरण अवलंबवित रेल्वेद्वारे आता त्यांच्याकडून निर्मित उर्जेवर गाड्या चालवल्या जाणार असल्याचे संकेत आहेत. मध्य रेल्वेतील भुसावळ विभाग हा महत्त्वपूर्ण विभाग मानला जाताे. या विभागात साेलर एनर्जी प्रकल्प कार्यन्वीत केला जाणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मूर्तिजापूर, अकाेला या स्थानकांची निवड झाली आहे.

 

रेल्वे मार्गाच्या बाजूला असलेल्या माेकळ्या जागेवर हा प्रकल्प कार्यान्वीत केला जाणार आहे. सौर उर्जानिर्मिती प्रकल्प हा पीपीपी याेजनेतून सुरू केला जाणार आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून किती निधी उपलब्ध होईल, याची माहिती दोन दिवसांत कळणार आहे. त्यानंतरच या प्रकल्पाला चालना मिळेल. विजेची बचत करण्यासाठी दोन्ही ठिकाणी उभारण्यात येणारे सौर उर्जानिर्मिती प्रकल्प हे निश्‍चितच उपयोगी ठरणार आहेत. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी बजेटमध्ये तरतूद केली जाऊ शकते. या बजेटमध्ये तरतूद झाल्यास प्रकल्पाच्या कामास तात्काळ सुरूवात केली जाणार आहे. सौर उर्जेमुळे रेल्वेची वीजबचत होणार आहे. तसेच आगामी काळात रेल्वे विभागाकडून स्वनिर्मित विजेवर रेल्वे चालविण्याच्या धोरणालाही प्राधान्य दिले जाऊ शकते. तसेच या प्रकल्पातून निर्माण हाेणारी उर्वरित वीज ही महावितरणला विकली जाणार आहे.

 

महत्त्वाचे ः  बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्त्व भाऊंकडून साहेबांकडे 

पिंक बुक आल्यावर चित्र स्पष्ट
केंद्र सरकारने शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अकोला व स्थानकांसह परिसरातील रेल्वे स्थानकांच्या वाट्याला काय येणार, याची रेल्वे कर्मचाऱ्यांसह रेल्वे अधिकारी आणि अकोलेकरांना उत्सुकता आहे. आठवडाभरात रेल्वे प्रशासनाला पिंक बुक प्राप्त झाल्यानंतर याची माहिती समोर येणार आहे. मुंबई-नागपूर या मार्गावर ७६३ किमी अंतरात बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. भुसावळ विभागातून बुलेट ट्रेन ५२६ कि.मी. अंतर कापेल. ही गाडी नेमकी कधी सुरू हाेते, या गाडीला भुसावळ विभागात किती थांबे असतील. या प्रश्नांची उत्तरे पिंक बुक प्राप्त झाल्यानंतरच मिळणार आहेत. त्यापूर्वीच भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना बुलेट ट्रेनची प्रतीक्षा लागली आहे. याच पार्श्वभूमीवर विवेवकुमार गुप्ता यांच्याशी संवाद साधला ते म्हणाले तिसरी व चाैथ्या रेल्वेलाइनसाठी आणखी निधी उपलब्ध हाेणार आहे.

 

हेही वाचा ः वडिलांनीच झाडली मुलावर गोळी

रेल्वेच्या मोकळ्या जागांचा वापर
अकोला, मूर्तिजापूर येथील रेल्वेच्या मोकळ्या जागेवर हे प्रकल्प साकारणार आहेत. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही रेल्वेसाठी वापरल्या जाईल. पीपीपी या तत्वावर हे प्रकल्प आधारीत असतील त्यामुळे या प्रकल्पाचा रेल्वेला मोठा फायदा होईल.
-विवेक गुप्ता, डीआरएम, मध्यरेल्वे भुसावळ विभाग

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola, Murtijapur railway station solar panel