आमदारकीची पाटी कोरी, तरी लागणार मंत्रीपदाची लॉटरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

 

  • राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिपदाची ‘लॉटरी’
  • शरद पवार यांनी दिले संकेत 
  • जिल्ह्यात एकही आमदार नाही, तरी मंत्रीपद
  • संधी कुणाला याकडे लक्ष

अकोला : पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. ज्या जिल्ह्यात विधानसभेमध्ये पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही, अशा जिल्ह्यात विशेष लक्ष घालण्यात येत असून, प्रोत्साहन देण्यासाठी अशा जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागू शकते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे संकेत दिले आहेत. त्यामुळे अकोला जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तरूण कार्यकर्त्यांना संधी देणे सुरू केले आहे. जेथे राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे, तेथे नवीन नेतृत्व तयार करण्यावर भर दिला जात आहे. मराठवाडा- विदर्भातील काही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस केवळ नावालाच आहे. अशा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्ष संघटना वाढीसाठी नवीन नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे. त्यातच आता राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीला वाटा मिळाल्याने त्याचा फायदा पक्ष संघटना वाढीसाठी करून घेण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या दृष्टिकोनातून सूचक संकेत दिले आहेत. एका खासगी मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला सहज मिळू शकले असते, असे असतानाही शिवसेनेला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री देण्यामागील रहस्य उलगडताना एक पद घेतल्या पेक्षा मंत्रीपद व काही राज्यमंत्रीपद वाढवून घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना वाढविण्यासाठी त्याचा फायदा करून घेता येणार असल्याचे पवार म्हणाले. 

जिल्ह्यात एकही आमदार नाही, तरी मंत्रीपद?
ज्या जिल्ह्यांमध्ये पक्षाचा आमदार निवडून आलेला नाही अशा ठिकाणी संघटना वाढीच्या दिशेने या वाढीव मंत्रिपदावर संघटनेसाठी भरीव कामगिरी करू शकणाऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असे संकेतही या मुलाखतीत पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे अकोलासारख्या विधानसभा निवडणुकीत पाटी कोरी असलेल्या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अकोल्यातून संधी कुणाला?
विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाळापूर आणि मूर्तिजापूर मतदारसंघात निवडणूक लढविली होती. मात्र या दोन पैकी एकाही मतदारसंघात राष्ट्रवादीला यश आले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची पाटी कोरीच राहली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या संकेतानुसार अकोला जिल्ह्याला मंंत्रिपदाची संधी मिळू शकते. त्यासाठी जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र निवडणुकीतील त्यांची कामगिरी आणि पक्षातील ज्येष्ठता त्यांच्यासाठी अडचणीची ठरणारी आहे. त्यांच्यासोबतच पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांची नावेही संघटनात्मक वाढीच्या दृष्टीने चर्चेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola ncp leaders will get ministry