हिंगोलीतील बनावट नोटांचे अकोला कनेक्शन

जीवन सोनटक्के
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

गुप्त माहितीच्या आधारावर पीपल्स बँकेजवळ पांढऱ्या रंगाची कार पकडली.
त्यामधून बनावट नोटांसह साहित्य जप्त करीत तिघांना अटक केलेली आहे. यातील
सूत्रधारास नागपूरमधून अटक झालेली आहे. हे सर्व सध्या परभणी कारागृहात
आहेत.
- तान्हाजी चेरले, पोलिस उपनिरीक्षक, तपास अधिकारी, शहर पोलिस हिंगोली.

अकोला : हिंगोली शहर पोलिसांनी १७ आॅगस्ट रोजी एका कारमधून ९४
हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करीत चार जणांना अटक केली होती.
त्यातील दोन आरोपी अकोल्याचे, एक वाशीम जिल्ह्यातील तर सूत्रधार नागपूरचा
असल्याचे समोर आले आहे. या बनावट नोटांचा तपास एटीएसही करीत असल्याने
याचे गांभीर्य वाढले आहे.

हिंगोली शहर पोलिसांनी गुरुवारी (ता. १७) रात्री गस्तीवर असताना पांढऱ्या
रंगाची स्विफ्ट डिझायर कार (एमएच-३१- सीए- ३९००) अडविली. वाहनाची तपासणी
केली असता, त्यामध्ये ९४ हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या.
पोलिसांनी सय्यद महेमूद सय्यद मकसूद कादरी (रा. शहर किल्ला, ता.
बाळापूर), शेख मोहसीन शेख मुक्तार (रा. बाळापूर नाका, जुने शहर), मो.
साकीब मो. आयुब (रा. शिक्षक कॉलनी, के. एन. महाविद्यालय रोड, कारंजा, जि.
वाशीम) या तिघांना अटक केली. या तिघांकडून मिळालेल्या माहितीनुसार
हिंगोली पोलिसांनी नागपूर क्राईम ब्रँचसोबत संपर्क साधून सूत्रधाराबाबत
माहिती दिली. माहिती मिळताच क्राईम ब्रँचने सूत्रधाराला अटक केली.

दरम्यान, अकोल्यातील दोन्ही आरोपींची हिंगोली पोलिसांनी कसून चौकशी केली.
त्यांच्याविरुद्ध याआधीचे कुठलेही गुन्हेगारी स्वरूपाचे पुरावे आढळले
नाहीत; आता हे दोघे बनावट नोटांकडे कसे वळले याचा तपास पोलिस करीत आहेत.
हिंगोली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणाची चौकशी दहशतवाद
विरोधी विभागाने (एटीएस) सुरू केली आहे. यासंदर्भात एटीएसच्या
अधिकाऱ्याने तपास सुरू असल्याचे सांगितले. मात्र, अधिक माहिती देण्यास
नकार दिला आहे.

कारमध्ये मिळालेले साहित्य
हिंगोली शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक तान्हाजी चेरले यांना कारमध्ये ९४
हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा, तीन मोबाईल, बनावट नोटांसाठी वापरण्यात
येणारी हिरव्या रंगाची चमकी, प्लास्टिक रोल, बनावट नोटांच्या मध्यभागी
वापरण्यात येणारा सिक्युरिटी थ्रेड, बनावट चलनी नोटा आदी साहित्य मिळाले.

नागपूरच्या सूत्रधाराच्या घरातून जप्ती
नागपूर पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणात सूत्रधारास अटक केली. त्याच्या
घराची झडती घेतली असता बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य,
बनावट ओळखपत्र तयार करण्याच्या यंत्रासह इतर आक्षेपार्ह साहित्य
पोलिसांनी आढळले.

गुप्त माहितीच्या आधारावर पीपल्स बँकेजवळ पांढऱ्या रंगाची कार पकडली.
त्यामधून बनावट नोटांसह साहित्य जप्त करीत तिघांना अटक केलेली आहे. यातील
सूत्रधारास नागपूरमधून अटक झालेली आहे. हे सर्व सध्या परभणी कारागृहात
आहेत.
- तान्हाजी चेरले, पोलिस उपनिरीक्षक, तपास अधिकारी, शहर पोलिस हिंगोली.

Web Title: Akola news fake note case in Hingoli