कृषी व्यावसायिकांच्या संपामुळे शेतकरी वेठीस!, न्यायालयीन लढाई लढण्याऐवजी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची कोंडी

संतोष गिरडे
सोमवार, 13 जुलै 2020

जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिल्या प्रकरणी कृषी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्या निषेधार्थ कृषीव्यावसायिकांकडून न्यायालयीन लढाई लढण्याऐवजी संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. यामुळे मात्र ऐन खरिपात शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत असून, त्याबाबत शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

शिरपूर (जि.वाशीम)  ः जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिल्या प्रकरणी कृषी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्या निषेधार्थ कृषीव्यावसायिकांकडून न्यायालयीन लढाई लढण्याऐवजी संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. यामुळे मात्र ऐन खरिपात शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत असून, त्याबाबत शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यासह इतर अनेक ठिकाणी काही कंपनीचे सोयाबीन बियाणे बोगस निघाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सध्या जगामध्ये कोरोना महामारीचे सावट आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सर्व घटकवर्ग लॉकडाउन असताना जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घराबाहेर पडून अविरतपणे शेतावर राबत होता. लॉकडाउन काळामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. भाजीपाला, फळे फेकावी लागली होती. तरीसुद्धा खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने केली.

अनेक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे कृषी विभागाकडून काही कृषी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या निषेधार्थ कृषी विक्रेत्यानी संपाचे हत्यार उपसून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून शेकडो तक्रारी दाखल झाल्या असताना संथ गतीने कारवाई कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

शासनाने हस्तक्षेप करून संप मिटवावा
सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांवर तणनाशक व कीटकनाशके फवारणी करण्याची कामे जोरात सुरू आहेत त्यामुळे तणनाशके, कीटकनाशके, खते या निविष्ठांची नितांत गरज आहे. मात्र बंद पुकारून कृषी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शासनाने त्वरित हस्तक्षेप करून कृषी व्यवसायिकांचा संप मिटवावा, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

(संपादन-विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola washim Farmers clash over agri-traders strike, farmers dilemma by traders instead of fighting court battle