ऑनलाईन शिक्षण थांबले गावाच्या वेशीवर, नेटवर्कचा थांगपत्ता लागेना: अँड्राईड मोबाईल आणावा कोठून?

राम चौधरी 
शुक्रवार, 10 जुलै 2020

सकाळी 9 वाजतापासून चिल्यापिल्यांसह युवकांची ऑनलाईन वर्गासाठी धावपळ सुरू होती. प्रत्येकजण मोबाईल समोर ठेवून ऑनलाईन शिक्षण घेते. कोरोनाने सर्व व्यवहार थांबले असतांना पालकांना मात्र मुलांचे शिक्षण सुरू असल्याचे समाधान मिळते हे चित्र शहरातील शिक्षणाचा पोत दर्शविते. गावखेड्यात मात्र कोरोनाने शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मोबाईल आहे तर नेटवर्क नाही. मात्र जेथे पूर्ण नेटवर्क आहे. तेथे अँड्राईड मोबाईल खरेदी करण्याची ऐपत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आता शिक्षण सोडून बांधावर रोजमजुरीने जात असल्याचे दुर्दैवी चित्र समोर येत आहे.

वाशीम : सकाळी 9 वाजतापासून चिल्यापिल्यांसह युवकांची ऑनलाईन वर्गासाठी धावपळ सुरू होती. प्रत्येकजण मोबाईल समोर ठेवून ऑनलाईन शिक्षण घेते. कोरोनाने सर्व व्यवहार थांबले असतांना पालकांना मात्र मुलांचे शिक्षण सुरू असल्याचे समाधान मिळते हे चित्र शहरातील शिक्षणाचा पोत दर्शविते. गावखेड्यात मात्र कोरोनाने शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मोबाईल आहे तर नेटवर्क नाही. मात्र जेथे पूर्ण नेटवर्क आहे. तेथे अँड्राईड मोबाईल खरेदी करण्याची ऐपत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आता शिक्षण सोडून बांधावर रोजमजुरीने जात असल्याचे दुर्दैवी चित्र समोर येत आहे.

कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाउन लागू झाले. शाळा, महाविद्यालयही बंद झालीत. अंतिम सत्राच्या परीक्षाही रद्द झाल्यात. आता नविन सत्र सुरू झाले आहे. शासनाने व्हिडीओ कॉलींगच्या माध्यमातून किंवा काही ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन वर्ग भरविण्यास परवानगी दिली आहे. शहरी भागात सकाळी 9 ते दुपारी 12 व सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम सांगितल्या जातो. गावखेड्यात मात्र या ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशाही होवू शकला नाही. ग्रामीण भागामध्ये मोबाईल नेटवर्क नाही. एकूण ग्रामीण लोकसंख्येच्या 5 टक्के नागरिकांकडे अँड्राईड मोबाईल आहे. मात्र 60टक्के नागरिकांकडे अजूनही मोबाईल पोहचला नाही. या ऑनलाईन शिक्षण प्रकारामध्ये गावाखेड्यात अजूनही शिक्षण पोहचत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मजुरी शंभर रूपये, मोबाईल मृगजळच
ग्रामीण भागामध्ये कोरोनाने भाकरीचा प्रश्न आभाळाएवढा केला आहे. पुण्या, मुंबईकडे राहत असलेला मजुरवर्ग लॉकडाउनमुळे गावात आला आहे. शेतकऱ्यांकडेही पीक कर्ज न मिळाल्याने शेतीवर खर्च करण्यासाठी पैसा नाही. परिणामी गावखेड्यात मजुरीचे दर खाली आले आहेत. सकाळी 10 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत शंभर रूपये मजुरी मिळते. या मजुरीत खायचे काय? आणि शिल्लक टाकायचे काय? असा प्रश्न प्रत्येक झोपडीत उभा राहतो. या परिस्थीतीत 10 ते 15 हजार रूपयांचा अँड्राईड मोबाईल हे गोरगरीबांसाठी मृगजळ ठरत आहे. हातात पैसा नाही. मुल मात्र शिक्षणापासून वंचित राहत असल्याची वेदना प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर दिसून येते.

शासनाने ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिली आहे मात्र प्रत्येकाकडेच अँड्राईड मोबाईल नाही ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जिओ टिव्हीसोबत करार केला आहे. पुढील महिण्यापासून पहिली ते नववीसाठी ठरावीक वेळात मोफत वर्ग तिन वेळा दाखविण्यात येणार आहेत. तसेच दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित व विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम या टिव्हीच्या माध्यमातूनच मोफत शिकविल्या जाणार आहे.
- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी वाशीम

लेखनीच्या जागी हातात खुरपे
सध्या शाळा सुरू झाल्या नाहीत. मजुरीही जेमतेम मिळत असल्याने गोरगरीबांच्या झोपडीत चुल पेटत नाही. त्यामुळे पाचवी ते बारावीपर्यंत शाळेत जाणारी मुले, आई-वडीलांसोबत खुरपणीला शेतात जातात. आईवडीलांच्या मजुरीत मिठ-मिरची साठी या चिमुकल्यांच्या हातात लेखणी ऐवजी खुरपे आले आहे. गेल्या 60 वर्षात अशी परिस्थीती कधी पाहली नाही अशी प्रतिक्रिया पार्डीटकमोर येथील वयोवृध्द शेतमजुर बायजाबाई वंजारे यांनी व्यक्त केली.

 

(संपादन- विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola washim Online education stopped at the village gate, the network could not be traced: Where to bring Android mobile?