अक्षय तृतीयेसारखं शुभमुहूर्त असंच वाया गेलं हो! अनेकांच्या तोंडी अशीच चर्चा... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

लॉकडाउनचा फटका अक्षय तृतीयेलादेखील बसला. एरवी अक्षय तृतीयेला शहरात जवळपास 2 ते 3 कोटी रुपयांची उलाढाल सोने-चांदीच्या खरेदीत होते. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे दुकानच बंद असल्याने सराफा व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय सोने खरेदी करण्यास न मिळाल्याने ग्राहकांचाही मोठ्या प्रमाणावर हिरमोड झाला. 

अमरावती : साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून अक्षय तृतीयाच्या सणाकडे बघितले जाते. या शुभ दिवशी नागरिक सोने खरेदीला प्राधान्य देतात. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास सुख, समृद्धी नांदते असे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. मात्र, यंदा अक्षय तृतीयेचा सण सोनेखरेदीविनाच लोकांनी साजरा केला.

लॉकडाउनचा फटका अक्षय तृतीयेलादेखील बसला. एरवी अक्षय तृतीयेला शहरात जवळपास 2 ते 3 कोटी रुपयांची उलाढाल सोने-चांदीच्या खरेदीत होते. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे दुकानच बंद असल्याने सराफा व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय सोने खरेदी करण्यास न मिळाल्याने ग्राहकांचाही मोठ्या प्रमाणावर हिरमोड झाला. 

ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांची पाठ 

दरम्यान, ऑनलाइन खरेदीकडेही ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर प्रत्यक्ष सोने हातात आल्यास त्याला महत्त्व आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन खरेदीकडेही पाठ फिरविल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यात शहरातील सराफा बाजार "हॉटस्पॉट'मध्ये येत असल्याने रविवारी या परिसरात अधिकच शुकशुकाट होता. 

अवश्य वाचा- सहा दिवसांच्या दिलाशानंतर पॉझिटिव्ह अहवालाने धक्का

दोन महिन्यांपूर्वी होता 3800 भाव 

दोन महिन्यांपूर्वी सोन्याचे दर प्रति ग्रॅम 3800 रुपये होते. ते सध्या 4700 रुपये झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच सोने-चांदीचे दर वाढले आहेत. लॉकडाउनमुळे दागिण्यांचे दर सातत्याने वाढत आहे, असे नागरिकांना वाटत असल्यामुळे ग्राहकांनीही सोने खरेदीला ब्रेक दिला आहे. 

संभ्रम कायम 

लॉकडाउननंतर सोने कमी होईल किंवा वाढेल याचे संभ्रम अजूनही कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार सोन्याचे दर लॉकडाउननंतर ठरेल. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोने खरेदी केली जाते. मात्र लॉकडाउनमुळे सर्वच समारंभांना ब्रेक लागला आहे. जूननंतर शेतीची कामे सुरू होतात. त्यामुळे दिवाळीनंतर साधारणतः सोने खरेदी केली जाते. त्यामुळे यंदा लॉकडाउननंतर काय परिस्थिती राहते, त्यावर सोने खरेदी अवलंबून राहील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Trutia Became usless. People Not purchased gold