कृषीप्रमाणे सर्व विद्यापीठांसाठी हवे सामाईक परीक्षा मंडळ!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

डॉ. संजय खडक्कार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; परीक्षेतील गैरवापर टाळण्यासाठी आवश्‍यक

अकोला : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासाठी असलेल्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या धर्तीवर राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासाठी सामाईक परीक्षा मंडळाची स्थापना करावी, अशी विनंती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे काम खासगी संस्थांच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती खासगी संस्थांना प्राप्त होऊन त्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अध्यापन, संशोधन व विकास, कौशल्य विकास प्रशिक्षण व शिक्षण, विस्तार व सेवा याद्वारे आणि परिणामकारक प्रात्यक्षिकांद्वारे समाज जीवनावर प्रभाव टाकून ज्ञान व सामंजस्य यांचा प्रसार, निर्मिती व जपणूक करणे हे विद्यापीठांचे प्रमुख उद्दिष्ट आहे; परंतु विद्यापीठांचा जास्तीत जास्त वेळ व श्रम परीक्षांच्या कामासाठी खर्च होतो. राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी सामाईक परीक्षा मंडळ स्थापन केले तर विद्यापीठांचा वेळ व श्रम वाचून तो वेळ विद्यापीठांच्या प्रमुख उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सत्कारणी लागेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे हे दहावीच्या 17 लाख विद्यार्थ्यांची व बारावीच्या 15 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी सहजरीत्या घेते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची परीक्षा घेण्यासाठी सामाईक परीक्षा मंडळ स्थापन केले आहे. हे परीक्षा मंडळ चारही कृषी विद्यापीठांच्या परीक्षा सुरळीत पार पाडते.

राज्यातील विद्यापीठात 38 लाख विद्यार्थी
महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्यांची संख्या जवळपास 38 लाख आहे. त्यात पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 33.5 लाख आहे. स्नातकोत्तर शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 4.61 लाख व आचार्य पदवी घेणाऱ्यांची संख्या 8796 एवढी आहे. या सर्वांची परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सामाईक परीक्षा मंडळ स्थापन करावे, अशी मागणी डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All the Universities like Agriculture should have a Common Examination Board