esakal | जुळ्या मुलींसह आईनेही मिळविले बारावीच्या परीक्षेत यश...कौतुकाचा वर्षाव
sakal

बोलून बातमी शोधा

नांदा : बारावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या कल्पना मांदाळे व त्यांच्या दोन जुळ्या मुली.

एखादी गोष्ट साध्य करायची असेल; तर त्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. लग्नांनतरही अनेक गृहिणी शिक्षणाला महत्त्व देत आहेत.. अशाच एका सुपर मॉमने आपल्या दोन जुळ्या मुलींसह बारावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक गावकऱ्यांनी केले आहे.

जुळ्या मुलींसह आईनेही मिळविले बारावीच्या परीक्षेत यश...कौतुकाचा वर्षाव

sakal_logo
By
संदीप खिरडकर

नांदा (जि. चंद्रपूर) : दोन जुळ्या मुली आणि त्यांच्या आईने बारावीची परीक्षा दिली. निकाल हाती आला अन्‌ घर आनंदाने भरून गेले. मुलींनी परीक्षेत यश मिळविलेच; पण त्यांच्या सोबतीने आईनेही यश गाठले. चूल आणि मूल सांभाळत आईने मिळविलेले शैक्षणिक यश मुलींना ऊर्जा देणारे ठरले आहे.

या सुपर मॉमवर आता कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. कल्पना देविदास मांदळे असे बारावीत यश गाठणाऱ्या आईचे नाव आहे. त्या कोरपना तालुक्‍यात येणाऱ्या आवाळपूर येथील रहिवासी आहेत.

आवाळपुरात आनंदच आनंद

चूल आणि मूल सांभाळत असतानाच कल्पना मांदाळे यांनी शिक्षणाची कास धरली. शिक्षणासाठी वयाचे बंधन नाही. हे सिद्ध करून दाखविणाऱ्या कल्पना मांदाळे या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्‍यात येत असलेल्या आवाळपूर येथील रहिवासी आहेत. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत. सौंदर्या आणि ऐश्वर्या अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही मुली दहावीला असताना कल्पना यांनीही दहावीची परीक्षा दिली होती. मुलीसोबत आता त्यांनी दहावीचा परीक्षेतही यश संपादन केले.

अन्‌ निकाल पाहून कुटुंबीय आनंदले

लग्नानंतरही त्यांची शिक्षणाची आवड कमी झाली नव्हती. याच आवडीतून त्यांनी कुटुंबीयांना सांभाळीत पुस्तकाशी मैत्रीचे नाते कायम ठेवले होते. आपल्या मुलींसोबत विद्यार्थी बनून त्याही शाळेत जायच्या. जिवती येथील प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालयाचा त्या विद्यार्थी होत्या. त्यांनी दहावीनंतरही शिक्षणात खंड पडू दिला नाही. घरची कामे उरकवून त्या अभ्यास करायच्या. घरातील दोन मुली आणि आई यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे निकालाची कुटुंबीयांना आतुरता लागली होती.

जाणून घ्या - सर, आम्ही चुकलो, आम्हाला परत घ्या! त्यांनी मागितली माफी अन्‌ गवसले हे यश....

58 टक्के गुणांनी उत्तीर्ण

निकाल हाती आला अन्‌ घरात आनंदाचे वातावरण पसरले. बारावीच्या परीक्षेत दोन्ही मुलींनी बाजी मारली; तर आई कल्पना यांनीही यश संपादन केले. 58 टक्के गुण घेऊन कल्पनाने यश मिळविले. चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता कुटुंबाची जवाबदारी पेलताना मिळविलेल्या शैक्षणिक यशाने कल्पना यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)